महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे 4 एकर ऊस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वलांडी (ता .देवणी)

महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वलांडी येथील एका शेतकऱ्याचा 4 एकर ऊस जळून खाक झाला. माधवराव कवठाळे असे त्याचे नाव असून वलांडी (ता. देवणी) येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाशेजारील शेतात विजेच्या मुख्य वीजवाहीनीवरील तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून कवठाळे यांचा चार एकर उस जळून खाक झाला. पीकं जळून खाक होण्याची ही दिड महीन्यातली दुसरी घटना आहे.

वलांडी येथील माधवराव कवठाळे यांची महावितरण कार्यालयाशेजारी सर्व्हे न. 149 मध्ये शेती आहे. रविवारी दुपारनंतर महावितरण कार्यालयाची वीज सुरु करताना तारांचे घर्षण होऊन ठिंणगी पडल्याने मोठी आग लागली. दुपारचे उन्ह, वारा, जवळपास पाणीसाठ्याचा अभाव यामुळे आग आटोक्यात येण्यात अडचणी आल्या. ग्रामस्थांनी झाडपाल्याचा वापर करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी आग लागल्याने चार एकर उस जळुन खाक झाला. अग्नीशामक दलाच्या गाड्या आग विझल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या. एक कवठाळे यांची महावितरण कार्यालयाशेजारी सात एकर शेती असुन अनेक विजखांब कवठाळे यांच्या शेतीत आहेत. त्यात वीजपुरवठ्याचे कनेक्शन बदलण्याची यंत्रणा कवठाळे यांच्या शेतीत असल्याने तेथे वांरवार शाँर्टसर्कीट होते. त्यातूनच एक महिन्यापुर्वीच 29 नोंव्हेबर रोजीही माधवराव कवठाळे यांचा महावितरण कंपनीच्या चुकीने दिड एकर उस जळुन खाक झाला होता. त्यांनी विजपुरवठ्याच्या सुविधा दुरुस्ती करुन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन दुष्काळात जगवलेला ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.

याच वेळी लगतच्या काशिनाथ भाऊराव भंडारे यांच्या शेतीतही आग लागून एक एकर तुरीचे पिक आगीत खाक झाले आहे. काशिनाथ भंडारे यांची काढणीला आलेली तुर जळल्याने त्यांच्या पन्नास हजार रुपयापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. — तर दुर्घटना टळली असती— महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यापुर्वी जळालेल्या उसाची दखल घेत आपली यंत्रणा दुरुस्त केली असती तर कवठाळे यांचा चार एकर उस जळला नसता. यात कवठाळे यांचे चार लाख रुपयापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. वारंवार होत असलेला विजपुरवठ्याचा दोष अधिकाऱ्यांनी का दुर्लक्षीत केला हा प्रश्न आहे. कवठाळे यांनी ऐन दुष्काळात पिकवलेले उसाचे पिक आगीच्या भक्षस्थानी पडले आहे.