महाराष्ट्राची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही – प्रा. वर्षा गायकवाड

भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे हलवल्या. जागतिक आर्थिक केंद्र दुसरीकडे हलवले, हिरे उद्योग गुजरातला पळवण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बुलेट ट्रेन मुंबईच्या माथी मारली. झोपडपट्ट्यातील लोकांना बेघर करुन त्या जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. मुंबई साठी भाजपाने 10 वर्षात काहीही केले नसून मुंबईवर अन्यायच केला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे काम भाजपाने केले, हे जनतेला आवडले नसून महाराष्ट्राची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही, मुंबईकर या गद्दारांना धडा शिकवतील, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले तसेच दिक्षाभूमीवर जाऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,   हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. माहीम दर्गा, माहीम चर्च येथे जाऊन प्रार्थना केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभेची निवडणूक ही देशाला दिशा देणारी असून लोकशाही व संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. दोन विचारांची ही लढाई असून सर्वांना जोडणारा, संविधान माननारा एक विचार आणि हुकूमशाही, मनुवादी विचार यांच्यातील ही लढाई आहे. मागील 10 वर्षात सरकारी यंत्रणांची स्वायतत्ता हिरावून घेतली आहे, भ्रष्टाचारांचे आरोप करुन ज्यांना नोटीस पाठवल्या जातात त्यांनाच भाजपात घेऊन स्वच्छ करण्याचे पाप केले आहे. जे भाजपाच्या धमक्यांना भित नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते, हेमंत सोरेन व अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले. भ्रष्टाचार बोकळला असून भाजपाने इलेक्टोरल बाँडमधून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. जातीवाद व सामाजिक वाद निर्माण करण्याचे काम भाजपाने केले आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत, नसीम खान, भाई जगताप यांच्यासह सर्व नेत्यांशी चर्चा झाली असून कोणतीही नाराजी नाही, या सर्व नेत्यांचा पाठिंबा व आशिर्वाद आपल्यासोबत आहेत. सर्वजण एकत्रिपणे ह्या निवडणुकीला सामारे जाणार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. जनतेच्या आशिर्वादाने ही निवडणूक जिंकू व मुंबई तसेच मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवू, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना माजी खासदार प्रिया दत्त, माजी मंत्री अस्लम शेख, आम आदमी पक्षाचे रूबेन रिचर्ड, समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हरून रशीद,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिलिंद कांबळे, आमदार अमिन पटेल,माजी खासदार हुसेन दलवाई, शिवसेना विभाग प्रमुख महेश पेडणेकर,माजी आमदार अशोक जाधव, बलदेव खोसा आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरताना वर्षा गायकवाड झाल्या भावूक

उमेदवारी अर्ज भरताना वर्षा गायकवाड या भावूक झाल्याचे दिसून आले.