अष्टपैलू अभिनेते कादर खान यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉलीवूडचे अष्टपैलू अभिनेते, पटकथा आणि संवादलेखक कादर खान यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने कॅनडा येथे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. खान यांनी सुमारे 300 चित्रपटांत अभिनय आणि 250 हून अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूडला हा धक्का बसला असून त्यांच्या निधनाने सच्चा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कादर खान यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते प्रोग्रेसिक्ह सुपरन्युक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. श्वसनाचा त्रास असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. खान हे अनेक वर्षे मुलासोबत कॅनडात वास्तव्याला होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर तिथेच अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान यांनी कळवले.

LOOK BACK 2018- जग सोडून गेलेले हिंदी कलाकार

कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबुल येथे झाला होता. लहानपणापासून त्यांना अभिनय आणि नाटय़लेखनाची आवड होती. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दाग’ या सिनेमातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमात काम करण्यापूर्वी त्यांनी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या जवानी-दिवानी या सिनेमासाठी संवाद लिहिले होते. केवळ अभिनेता नाही तर पटकथा, संवादलेखक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी पटकथा लेखन केले होते. मनमोहन देसाई यांच्यासोबत धर्म वीर, गंगा जमुना सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर ऍन्थोनी तर राकेश मेहरा यांच्यासोबत ज्वालामुखी, शराबी, लावारीस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. 2015 साली प्रदर्शित झालेला ‘दिमाग का दही’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.