
सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र, महाराष्ट्रातील विदर्भ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश- मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड याला सर्वाधिक उष्णतेच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. विदर्भ आणि बुंदेलखंडमध्ये २० मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. बांदामध्ये तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचले होते. जंगलतोड, खाणकाम, खडकाळ भूभाग, भूजल पातळीतील घट आणि हवामान बदल यामुळे हिंदुस्थानात उष्णतेचा प्रकोप होत आहे.
उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या २७ शहरांपैकी ६ शहरे विदर्भात आहेत. त्यात वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ ही शहरे आहेत. तर ४ शहरे बुंदेलखंड प्रदेशात आहेत. त्यात बांदा, खजुराहो, दमोह, सतना यांचा समावेश आहे. बांदामध्ये तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचले. ते देशातील आणि जगातील सर्वाधिक तापमान आहे.
हे दोन्ही प्रदेश मध्य हिंदुस्थानातील शुष्क आणि अर्ध-शुष्क पठारी प्रदेशात येतात. विदर्भ सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला वसलेला आहे. तिथे उष्ण वारे सहजपणे शिरतात. बुंदेलखंडमध्ये खडकाळ जमीन, कमी पाणी साठवण क्षमता आणि पाण्याचा जलद निचरा होतो. दोन्ही प्रदेशांतील माती जास्त काळ ओलावा टिकवून ठेवत नाही. त्यामुळे पृष्ठभाग वेगाने तापतो.
मोठ्या प्रमाणावरील जंगलतोडीमुळे या प्रदेशांतील स्थानिक तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) च्या २०२३ च्या अभ्यासानुसार, उष्णकटिबंधीय प्रदेशांतील जंगलतोडीमुळे दैनंदिन कमाल तापमानात ४.४°C पर्यंत वाढ होऊ शकते. औद्योगिक विस्तार आणि खाणकामामुळे विदर्भातील वनक्षेत्रात झपाट्याने घट झाली आहे. बुंदेलखंडमध्ये कृषी विस्तार आणि खाणकामामुळे जंगलांचे नुकसान झाले आहे.
बुंदेलखंडमधील मोठ्या प्रमाणावरील दगड खाणकाम, वाळू उत्खनन आणि दगडखाणींमुळे संपूर्ण प्रदेश उष्णतेचा सापळा बनला आहे. दगडखाणींमुळे वृक्षतोड, जमिनीची धूप आणि भूजल पातळीत घट होते, ज्यामुळे नैसर्गिक शीतलीकरणात अडथळा येतो. कोळशाच्या खाणी आणि इतर खाणकाम उपक्रमांमुळे विदर्भातील जंगलेही नष्ट होत आहेत.
उद्योग, खाणी आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा गरम होते. ज्यामुळे ‘हीट आयलंड इफेक्ट’ (उष्णता बेटाचा परिणाम) निर्माण होतो. नागपूर आणि आसपासच्या शहरांमधील उद्योगांची घनता देखील या उष्णतेत भर घालते. आयपीसीसीच्या अहवालानुसार आणि सीईईडब्ल्यू (ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद) च्या उष्णतेच्या लाटेच्या धोक्याच्या अभ्यासानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे हे दुष्काळप्रवण प्रदेश अधिक असुरक्षित बनत आहेत. गेल्या २०-३० वर्षांत या भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता दोन्ही वाढली आहे.
विदर्भ आणि बुंदेलखंडमधील तीव्र उष्णतेच्या लाटा केवळ हवामानाचा परिणाम नाहीत, तर जंगलतोड, अनियंत्रित खाणकाम, प्रदूषण आणि जमिनीचा ऱ्हास यांचा एकत्रित परिणाम आहेत, जे हवामान बदलामुळे अधिकच गंभीर झाले आहेत. जर या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, खाणकामावर कठोर नियंत्रण, भूजल संवर्धन आणि शाश्वत विकासाची धोरणे अवलंबली नाहीत, तर भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.



























































