आजच्या तुळशीची कथा

637

>> डॉ. विजया वाड  

जालिंधरने समोरचे पराठे भराभरा संपवले. गरमागरम पराठे पोटात गेल्यावर त्याला खरे तर खूप समाधान वाटले होते. सकाळी प्रातःसमयी उठून त्याने गुरुचरित्राचे पठण केले होते. वृंदा जालिंधरची पत्नी त्याला म्हणाली, “आपण गुरुचरित्राचे पठण करता आणि नंतर चेनची चोरी करायला बाहेर पडता… हे पटत नाही हो मनाला.’’

तिला अनपेक्षितपणे गालावर थप्पड बसली. जालिंधरची ही कृती तिच्या मनास अतिशय लागली. पण तिने धीर करून एवढे म्हटलेच, “बायकोला मारण्यात पुरुषार्थ आहे का? ही विकृती आहे.’’ आता पाठीत दणके बसले. ‘राक्षस’ हा शब्द मात्र मनातच… हो मनातच उच्चारला गेला. कारण शरीर बळ त्याच्याशी लढाई करण्यात कमी पडले असते ना!

जालिंधर स्कूटर घेऊन बाहेर पडे नि स्कूटरचा नंबर म्हणजे नंबरप्लेट रोज बदले. डोळ्याला गॉगल, तोंडाला बाया बांधतात तसा रुमाल, डोईला हेल्मेट! भर्रभरारा स्कूटर न्यायची नि पायी चालणार्‍या बायांच्या चेन खेचायच्या. मंगळसूत्र खेचायची, रिक्षात बसलेल्यांच्या पर्स खेचायच्या किंवा अलगद उचलायच्या.

अजून पोलिसांना सापडत नव्हता. कसा सापडणार ना मास्कधारी? घरी आला की वृंदाच्या हातचे भरपेट जेवेल नि झोपा काढेल. रोजचा दिनक्रम हाच!

बाळकृष्ण घरी आला तेव्हा वृंदा कोण आनंदली! इयत्ता पहिली ते बारावी दोघे एका वर्गात शिकलेले. जालिंधर घरी नाही अशी वेळ बघून बाळकृष्ण घरी येई.

“काय करीत होतीस?’’ त्याने विचारले.

“माझ्या लाडक्या तुळशीची पूजा करीत होते. माझे सारे दुःख मी तिलाच सांगते बाळकृष्णा. जालिंधरचा ‘माणूस’ कर… असा आग्रह धरते तिजपाशी. त्याच्यातला राक्षस मरो… अशी प्रार्थना रे! बाळकृष्णा, पुढच्या काही वर्षांत आम्हास मुले झाली नि ती शाळेत जाऊ लागली तर बापाचा व्यवसाय काय? याचे उत्तर चोर? चेन चोर? नरराक्षस?’’ वृंदाला रडू फुटले.

“तू ज्या तुळशीला रोज मनोभावे पुजतेस तीही आधीच्या जन्मात वृंदाच होती गं. नि नवरा राक्षस! जलांधर! पूजापाठ करून देवांना वरचढ झालेला. शेवटी विष्णूने त्याची पत्नी वृंदा हिला जालंधरचे रूप घेऊन भ्रष्ट केले, नि जालंधर शेवटी पराभूत झाला. पतिक्रता वृंदाने शाप देऊन विष्णूचा काळा दगड-शालिग्राम केला नि पुढे राजजन्मात त्याला सीतेचा विरहाचे दुःख दिले. पण वृंदा, कृष्णजन्मात ती स्त्री ‘तुलशी’ झाली नि तिचा कृष्णाशी विवाह झाला गं!’’ बाळकृष्ण वृंदाला ‘गोष्टी’तून काही सुचवीत होता. “बाळकृष्णा, या जन्मी असे काही सुचवू नकोस, ज्याने आपल्या निर्मळ मैत्रीत बाधा येईल. मी खरंच सांगते बाळकृष्णा, मी तुझ्याकडे माझा अतिशय आवडता मित्र म्हणूनच बघितलंय रे! म्हणून तर तुझ्याशी सारी सुख-दुःखे निर्मळ मनाने शेअर करू शकते ना?’’

एवढ्यात जालिंधर परतला. बाळकृष्ण स्वयंपाकघरात गरमागरम पराठे खाताना बघून चवताळला.

“मी नसतानाच का येतो हा बाळ्या?’’ त्याने बाळकृष्णापुढची थाळी उडवली नि वृंदाची वेणी कच्चकन् आवळली.

“गुरू चरित्र वाचतोस नि निष्पाप बायकोवर संशय घेतोस?’’ बाळकृष्ण ओरडला.

“तुझी देवभक्ती खोटी, तुझा व्यवसाय नीच. तू नरराक्षस आहेस.’’ बाळकृष्ण बेभान झाला.

“थांब, तुझ्या देखत हिचं काय करतो ते! रंडी…’’ त्यानं वृंदाच्या गळ्याभोवती त्याचा स्कार्फ आवळला.

बाळकृष्ण त्वेषाने पुढे आला नि त्याने अर्धमेल्या बालमैत्रिणीची सुटका केली.

जालिंधरही रागाच्या पार्‍यावरून खाली घसरला.

“बायको, चुकलो गं!’’ जालिंदर म्हणाला. ती मात्र मित्रास म्हणाली,

“बाळकृष्णा, तुला आपल्या पवित्र मैत्रीची शपथ… तू जा आता.’’

“का राहातेस इथे?’’ तो कळवळून विचारत होता.

“पती आहेत ते माझे. आता कधीच येऊ नको इथे. पुढच्या जन्मी आता…’’ तिने हात जोडले. बाळकृष्ण कष्टी होऊन परतला जालिंधर डोकं धरून बसला होता नि वृंदा मन रमवण्यासाठी तुळशीला रांगोळी घालून वृंदावन सजवीत होती. पण मन ? अशांत महासागर!

प्रिय मैत्रिणींनो, आपल्यातल्या कितीतरी वृंदा अन्याय, अत्याचार सहन करीत जगतात. आई-बापांना दुःख नको म्हणून सारं आतल्या आत पचवतात नि पुढल्या जन्मी सुख दे देवा म्हणत हा उभा जन्म वनवासात काढतात. पुढला जन्म आहे? मला ठाऊक नाही. पण हा जन्म, न्यायाने जगूया. विश्वास, प्रेस, स्थैर्य यांची मागणी म्हणजे ‘अति’ काहीच नाही गं सयांनो.

जिचा आत्मा शुद्ध… जिचे पवित्र गं मन

तिने झिजवावे कशासाठी, अन्यायाने तन?

चला जगूया सामर्थ्ये… नको फुकाची गुलामी

चला देऊ आयुष्याला… आत्मविश्वासी सलामी  

आज तुलसी विवाह. तुळस… अंगण… गॅलरी… कुठेही अगदी दाटीवाटीतही प्रत्येकाच्या दाराची शोभा असणारी… आपल्या सगळ्या जणींच्या सुखदुःखाची सोबती… सखी… आजच्या तुळशीची ही छोटीशी कथा…

आपली प्रतिक्रिया द्या