नूपुर शर्मांच्या विधानाविरुद्ध पुन्हा हिंसाचार उसळला, बंगालमध्ये लोकलवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाविरुद्ध रविवारी बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला जवळपास एक हजार मुस्लिमांचा जमाव अचानक रेल्वे स्थानकात घुसला. संतप्त जमावाने लोकल ट्रेनला टार्गेट करीत तुफान दगडफेक आणि गाडीची तोडफोड केली. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बेथुआडहरी मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद केली आहे.

नूपुर शर्मा यांनी टीव्हीवरील डिबेटमध्ये बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभर ठिकठिकाणी निदर्शने केली. बंगालमध्ये काही ठिकाणच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. नूपुर शर्मा यांना अटक न झाल्याने मुस्लिम समाजात असंतोष खदखदता आहे. रविवारी नादिया जिह्यात जवळपास एक हजारहून अधिक निदर्शकांनी रास्ता रोको केला. या जमावाने अचानक बेथुआडहरी रेल्वे स्थानकात घुसून लोकल ट्रेनवर तुफान दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. यात लोकलचे प्रचंड नुकसान झाले. तसेच स्थानकातील अनेक प्रवासी जखमी झाले. संतप्त जमावाला नियंत्रणात आणणे सुरक्षा यंत्रणांनाही मुश्कील बनले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठा हलकल्लोळ उडाला.

रेल्वे स्थानकांच्या आवारात पोलिसांचा कडक पहारा

नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला जमाव अचानक आक्रमक झाला. रविवारी रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन ऍलर्ट मोडवर असून बेथुआडहरी मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. तसेच या मार्गावरील प्रमुख स्थानकांच्या आवारात पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.