महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय 1 ची जुनी जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवली जाणार असून वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्याने टाकलेल्या 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार आहे. ही दोन्ही कामे शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजताच्या दरम्यान केली जाणार आहेत. या कामांमुळे एच-पश्चिम विभागातील म्हणजे वांद्रे-खार येथील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जलवाहिनी दुरुस्तीमुळे पेरी परिक्षेत्र- वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग, खार दांडा परिक्षेत्र- खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गलगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार सुरळीत होईल, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी तसेच एच-पश्चिम विभागातील पाणीपुरवठय़ात सुधारणा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.