
ठाणे पोलीसांची वेबसाईट हॅक झाली आहे. अशा अनेकठिकाणी हॅक झालेल्या वेबसाईट संदर्भात पोलीस तपास करत आहेत. या वेबसाईट हॅक केल्यामुळे कोणताही महत्वाचा तपशील गेलेला नाही. समाजा समाजांमध्ये दुफळी माजवण्याचे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्याचाच हा परिणाम आहे. असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर हॅकर्सनी मंगळवारी सकाळी सायबर हल्ला चढवला. हॅकर्सनी ही वेबसाईट बंद पाडत तिथे आपला बॅनर झळकावला. हॅकरने त्याच्या संदेशात जगभरातील मुसलमानांची माफी मागा असं म्हटलं आहे. आमच्या प्रेषिताची बदनामी होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही असंही हॅकरने झळकावलेल्या बॅनरवर लिहिलं आहे.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की पोलिसांच्या सायबर विभागाचे प्रमुख ADG मधुकर पांडे हे देखील यासंदर्भात थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत. यासंदर्भात सर्व माहिती ते माध्यमांना देतील. राज्यसरकारच्या वतीने या सर्व घटनेचा आढावा घेण्यात आला आहे. यासाठी कोणत्या उपाययोजना राबवायच्या यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. या घटनेसंदर्भात अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
समाजात विद्वेष पसरवला गेल्यामुळे टोकाचा विचार करणाऱ्या काही धर्मातील व्यक्तींकडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत आहेत. हे चुकीचे आहे. सर्व धर्मियांना सलोख्याने राहायचे असल्यास एकमेकांच्या भावना समजणे गरजेचे आहे. अशा प्रक्षोभक आवाहनांमुळे नुकसान सर्वांचेच होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. असे वळसे पाटील म्हणाले.




























































