
सलग दोन दिवस पावसामुळे रडतखडत चाललेल्या पश्चिम रेल्वेची लोकल सेवा शुक्रवारी लागोपाठच्या तांत्रिक बिघाडाने पूर्णपणे विस्कळीत झाली. सकाळी ऐन पीक अवर्सला दादर ते चर्चगेटदरम्यानची लोकल वाहतूक तब्बल 20 मिनिटे ठप्प झाली. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल जागोजागी उभ्या राहिल्या आणि हजारो नोकरदार रेल्वे स्थानके व ट्रेनमध्ये अडकले. 20 मिनिटांनंतर चर्चगेटकडील वाहतूक सुरू झाली. मात्र दिवसभर बहुतांश गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्याने रेटारेटी आणि गर्दीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शहरात मागील दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी विश्रांती घेतली होती. पावसात कोलमडलेली लोकल सेवा ‘रुळावर’ असेल या आशेवर कामावर निघालेले नोकरदार ऐन पीक अवर्सला पश्चिम रेल्वेवर झालेल्या गोंधळामुळे अतिरिक्त अर्धा ते एक तास प्रवासातच खोळंबले. सकाळी 6 ते 7.22 या वेळेत दादर आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. हा बिघाड दूर केल्यानंतर लगेचच 8 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थानकावर रुळांच्या दिशा बदलणाऱ्या यंत्रणेशी संबंधित ‘पॉइंट फेल्युअर’चा तांत्रिक बिघाड झाला.
लागोपाठच्या तांत्रिक बिघाडाच्या या गोंधळाने दादर ते चर्चगेट स्थानकांदरम्यानची लोकल वाहतूक तब्बल 20 मिनिटे ठप्प झाली. सकाळच्या सुमारास चर्चगेटला जाणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अप दिशेकडील चर्चगेट लोकल फेऱ्यांना खचाखच गर्दी असते. शुक्रवारी सकाळच्या गोंधळात अनेक लोकल फेऱ्या कराव्या लागल्याने नंतरच्या सर्व ट्रेनमध्ये रेटारेटी आणि गर्दीत प्रवास करताना नोकरदारांची दमछाक झाली. तांत्रिक बिघाडाबद्दल अनेक रेल्वे स्थानकांत योग्यरीत्या उद्घोषणा केली जात नव्हती. ठप्प झालेली लोकल वाहतूक कधी सुरू होईल, याबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि गोंधळ उडाला. प्रवाशांना पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आल्याने संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. सोशल मीडियातही प्रवाशांनी रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दादर, अंधेरी, बोरिवलीच्या प्लॅटफॉर्मवर ‘ओव्हरफ्लो’ गर्दी
ऐन पीक अवर्सला लोकल वाहतूक ठप्प झाल्याने दादर, अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल या प्रमुख स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. पश्चिम रेल्वेबरोबर मध्य रेल्वेच्या प्रवाशांची वर्दळ असलेले दादर स्थानक तसेच अंधेरी, बोरिवली स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर ‘ओव्हरफ्लो’ गर्दीचे चित्र होते. सकाळी 9 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासही जागा नव्हती. अनेकांनी बेस्ट बस, मेट्रो, रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय निवडून पुढील प्रवासाची वाट धरली.
दिवसभर अनेक गाडय़ा 15 ते 20 मिनिटे उशिराने
सकाळच्या गोंधळाने लोकल प्रवाशांना सायंकाळपर्यंत मनःस्ताप दिला. दिवसभर अनेक गाडय़ा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या. तांत्रिक बिघाडामुळे प्रशासनाला काही लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यात ‘लेडीज स्पेशल’ ट्रेनचाही समावेश होता. रेल्वेच्या गोंधळात अडकू नये म्हणून कित्येक प्रवाशांनी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडय़ाचा भुर्दंड सहन केला.































































