
सामना प्रतिनिधी । मुंबई
1990 साली पासआऊट झाल्यानंतर जामनेर तालुक्यातील आर. टी. लेले महाविद्यालयातील शेतकरी कुटुंबातील तरुण व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी सत्कार्य करण्याच्या उद्देशातून ‘सवंगडी’ नावाचा एक ग्रूप तयार केला. या ग्रूपने नुकतेच आदर्शवत ठरावे असे सामाजिक कार्य केले आहे. ग्रूपमधील सदस्यांनी पैसे काढून जमलेली रक्कम कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम मुस्तापुरे (20) या जवानाच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली आहे.
जामनेरच्या आर. टी. लेल शाळेच्या 1990 च्या दहावीच्या बॅचच्या मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन मार्च 2017 मध्ये ‘सवंगडी’ नावाचा ग्रूप तयार केला. या ग्रूपवर केवळ समाजोपयोगी मेसेज करायचे तसेच ग्रूपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे असा उद्देश त्यावेळी समोर ठेवण्यात आला. ग्रूपमध्ये बहुतेक करून शेतकरी असून काही खासगी ठिकाणी कामाला आहेत. 11 नोव्हेंबर 2018 ला ग्रूपचे दुसरे स्नेहसंमेलन झाले. त्यावेळी सर्व ग्रूपसदस्यांनी निश्चय केला की, परभणी जिह्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आणि अवघ्या 20 व्या वर्षी दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेले शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची. सर्वांनी त्याचवेळी शक्य तितकी रक्कम देऊ केली. त्यामुळे 45 हजारांची रोकड जमा झाली. त्यानंतर सवंगडी ग्रूपचे शरद पांढरे, अरुण कुमावत, शरद पांढरे, अमृत बारी, सुपडू मोरे, प्रवीण नागपुरे यांनी मुस्तापुरे यांच्या घरी जाऊन त्यांनी शहीद शुभम यांच्या आईकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
असे मिळाले प्रोत्साहन
महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकच्या 1996 च्या पोलीस उपनिरीक्षक बॅचने ‘शहीद कृतज्ञता निधी’ शहीद शुभम यांच्या कुटुंबीयांना दिल्याची माहिती ‘सवंगडी’ ग्रूपला मिळाली. मग त्यातून प्रोत्साहित होऊन ‘सवंगडी’ ग्रूपने शुभम यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायचे ठरवले आणि त्यानुसार मुस्तापुरे कुटुंबाला मदत केली.
देशाला प्राधान्य
शेतकरी कुटुंबात जन्मलेले शुभम यांना इंजिनीयर व्हायचे होते, पण कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले. अवघ्या 19 व्या वर्षी शुभम लष्करात सहभागी झाले. ते लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असताना अवघ्या 18 वर्षांच्या सेवाकाळात विसाव्या वर्षी शुभम यांना टोपी पोस्टवर वीरमरण आले.




























































