प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिकच, योग्यवेळी त्यांना शिवसेनेत यावंच लागतं! संजय राऊत यांचं प्रतिपादन

भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकनाथ पवार यांनी पक्ष प्रवेशावेळी केलेले भाषण हे एका शिवसैनिकाचं भाषण होतं, असं संजय राऊत म्हणाले. प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिकच असतो. तो इकडे असला काय आणि तिकडे असला काय, योग्यवेळी त्यांना शिवसेनेत यावंच लागतं. एकनाथ पवार हे योग्यवेळी शिवसेनेत आलेले आहेत. ते मगाशी म्हणाले की लोहा कंधारचा पुढला आमदार शिवसेनेचा असेल आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा प्रयत्न करेन असं वचन दिलेलं आहे. हे पक्ष संघटनेत काम केलेला कार्यकर्ताच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकेल, की मी पक्ष वाढवेन, संघटना वाढवेन असं राऊत म्हणाले.

एकनाथ पवार यांचं कार्यक्षेत्र हे पिंपरी – चिंचवड जरी असलं तरी मराठवाड्यात सुद्धा त्यांचा चांगला वावर आहे आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या संघटना वाढीमध्ये एकनाथ पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे आणि असा संघटनेतला कार्यकर्ता आज शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत आलेला आहे. शिवसेना सत्तेत नाही, उद्धव ठाकरेंकडे याक्षणी देण्यासारखं काही नाही. 2024 ला असेल मात्र या क्षणी काही नाही, असंही ते म्हणाले. तरी आपण येताहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यावर संघटनेची जबाबदारी भाजप मध्ये होती. आणि उद्धवजींनी सांगितलं आहे की अशा प्रकारे संघटना बांधणीची जबाबदारी एकनाथ पवार यांना शिवसेनेत सुद्धा द्यावी. म्हणून शिवसेनेचे संघटक म्हणून त्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केल्याचं संजय राऊत म्हणाले.

पक्ष बांधणीचा आपला अनुभव हा फक्त पिंपरी – चिंचवड किंवा लोहा कंधार पर्यंत मर्यादित न ठेवता मराठवाडा, पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये शिवसेनेला ताकद मिळेल असं काम आपल्याकडून अपेक्षित आहे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं.