
छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत झालेल्या वादातून तिची गळा आवळून हत्या केली आहे. छत्तीसगड मधील बेमेटरा येथे ही घटना घडली आहे. 28 वर्षीय सुशील साहू हा त्याची 25 वर्षीय पत्नी राणी साहूसोबत खांडसरा येथे राहत होते. काही दिवसांनी कामानिमित्त दोघेही लखनौ येथे स्थायिक झाले. मात्र लखनौमध्ये सुशीलची पत्नी राणी हिचे एका पुरुषासोबत प्रेम संबंध जुळले. सुशीलने त्याच्या पत्नीला या पुरुषासोबत संबंध ठेवताना देखील पाहिले होते. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
पत्नीच्या अनैतिक संबंधावरून दोघांमध्ये दररोज वाद व्हायचे. एके दिवशी दोघांचे भांडण सुरु असताना राणी तिच्या पतीला म्हणाली की, मला घटस्फोट दे, मग मी तुझ्यासमोर 10 पुरुषांशी संबंध ठेवेन. तिच्या या म्हणण्याचा सुशीलाला प्रचंड राग आला. यावेळी रागाच्या भरात सुशीलने पत्नी राणीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने राणीचा मृतदेह आपल्या खोलीत ओढून नेला. तेथे साडीच्या सहाय्याने गळफास लावून मृतदेह पंख्याला लटकवला.
पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर सुशील साहूने स्थानिक पोलीस ठाणे गाठले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळे आणि मी तुझ्यासमोर 10 पुरुषांशी संबंध ठेवेन असे म्हणाल्यामुळे मी पत्नीची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
























































