…तर राजकीय निवृत्ती घेईन, अजित पवारांचे विरोधकांना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-sangli

सामना प्रतिनिधी । पुणे

शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ येथील गोळीबारप्रकरणी माझ्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि गोळीबारासंबंधीचा अहवाल आहे. एकदा दूध का दूध आणि पानी का पानी होऊनच जाऊ द्या, यात जर दोषी आढळलो तर मी राजकीय निवृत्ती घेईन आणि जर मी दोषी आढळलो नाही तर आरोप करणाऱ्यांनी निवृत्ती घ्यावी, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार पत्रकारशी बोलत होते. मी एका शेतकऱयाचा मुलगा आहे. मी देखील शेतकरी आहे. जीवात जीव आहे तोवर शेतकऱयांच्या विरोधात काम करणार नाही. मी गोळीबाराच्या सूचना दिल्या होत्या हे कोणीही सांगितलं आणि जर हे खरं ठरलं तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल. मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप सातत्याने होतात. जे आरोप करत आहेत त्यांनीही आपली कारकीर्द पणाला लावावी. चौकशी अहवाल लोकांसमोर ठेवावा. दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्यात, असे आव्हान त्यांनी दिले.

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये

गांधी घराण्याने देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱया पंतप्रधान मोदींकडून फारशा अपेक्षा करू नयेत, असे सांगत मोदी यांनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबीयांची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी लाखो कार्यकर्ते आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात पवार बोलत होते.