
नृत्याच्या नावाखाली परदेशात पाठवून तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारी व गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेली महिला अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आली. त्या महिलेला एलओसीवर ठेवण्यात आले होते.
रझिया पटेल असे त्या महिलेचे नाव आहे. ऍग्नेस हॅमिल्टन व रजिया पटेल यांनी आपसात संगनमत करून तक्रारदार तरुणीला नृत्य करण्यासाठी सांगून केनिया देशातील नैरोबी येथे पाठविले होते. नैरोबीत गेल्यानंतर तरुणीला हॉटेल अझुरे वेस्टलॅण्डमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. तसे न केल्यास ड्रग्जच्या गुह्यात अडकवू अन्यथा ठार मारू असे धमकावले होते. शिवाय त्या तरुणीचा पासपोर्ट काढून घेतला होता. दरम्यान, यांच्याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ऍग्नेस हॅमिल्टन हिला पकडले होते, पण रजिया पटेल ही नैरोबीतच थांबली होती. त्यामुळे तिला एलओसीवर ठेवण्यात आले होते. अखेर ती नैरोबीवरून अहमदाबादमध्ये येताच तिला पकडण्यात आले.
























































