मी स्पष्टवक्ता आहे, पण गद्दार नाही; कठीण काळात ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही, शत्रूघ्न सिन्हा यांचे मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आणि आमदार, खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. विधानसभेमध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांनी, तर लोकसभेमध्ये काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली 20 खासदारांनी वेगळा गट बनवला बनवला. यात ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोलचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांचेही नाव होते. मात्र आपण ममता बॅनर्जी यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट करत सिन्हा यांनी बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आसनसोलचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी गुरुवारी नवी दिल्लीत माध्यमांसमोर आपली सविस्तर भूमिका मांडली. 2019 मध्ये जेव्हा मी पाटणा मतदारसंघातून निवडणूक हरलो. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्पा होता. तेव्हा फार कमी लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. पण ममता बॅनर्जी त्या मोजक्या लोकांपैकी एक होत्या ज्यांनी मला केवळ धीरच दिला नाही, तर माझा संसदीय प्रवास थांबता कामा नये या विश्वासाने मला आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास सांगितले, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ममता दीदींच्या मार्गदर्शनामुळे आणि आसनसोलच्या जनतेच्या प्रेमामुळे मी तृणमूलच्या चिन्हावर एकदा नव्हे तर दोनदा मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. त्यामुळे आज जेव्हा ममता दीदींवर आणि पक्षावर कठीण प्रसंग आला आहे, तेव्हा मी त्यांची साथ सोडून जाणे अशक्य आहे. कठीण काळात ज्यांनी मला सांभाळले, त्यांच्या संकटकाळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आणि तत्व आहे.

मी स्पष्टवक्ता आहे, पण गद्दार नाही!

माझ्याबद्दल सध्या बाजारात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोक खरे बोलत आहेत, तर काही जण जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवत आहेत. मी तथाकथित बंडखोर गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे. स्वभावत: मी नेहमीच स्पष्टवक्ता राहिलो आहे आणि जे सत्य आहे ते तोंडावर बोलण्याची माझी सवय आहे. जर स्पष्टपणे खरे बोलण्याला लोक बंडखोरी म्हणत असतील, तर मी नक्कीच बंडखोर आहे! परंतु, याचा अर्थ मी ममता दीदींशी प्रतारणा करेन असा होत नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.

आसनसोलच्या जनतेचे मानले आभार

ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून मी पहिल्यांदा बंगालमध्ये आलो. आसनसोलच्या जनतेने पहिल्याच पोटनिवडणुकीत मला देशात सर्वाधिक मताधिक्य देऊन रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून दिला. दुसऱ्यांदाही त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. मी बंगालमध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकासाठी काम केले आहे, मग त्यांनी मला मत दिले असो वा नसो. मी माझी जबाबदारी पूर्णपणे ओळखतो आणि ती पुढेही पार पाडत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा, लोकसभेनंतर राज्यसभेतही TMC फुटली; तिसऱ्या खासदाराचा राजीनामा, प्रकाश बराईक यांनी सोडली ममतांची साथ