महापौरांच्या ‘एन’ विभागात १० कोटींची कामे, निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागात विविध कामांवर सुमारे १० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. एकाच विभागावर एवढ्या मोठया प्रमाणात निधी खर्च झाला आहे. निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

एन विभाग हा महापौर रितू तावडे यांचा प्रभाग आहे. ‘एन’ विभागातील ५ लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या कामांची माहिती प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी ही जनतेच्या पैशाची लूट असल्याचा आरोप केला.

एन विभागातील विविध कामे करण्यात आली असून यामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी सुमारे २.०६ कोटी रुपये, मोटर लोडर योजनेसाठी १.९० कोटी आणि १.८५ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय मार्गिनिंग व मॅपिंग, रस्ते स्वच्छता, पिकअप वाहन, यांत्रिक झाडू, वॉशिंग अँड सॅनिटायझर, टेम्पो, जेसीबी डंपर तसेच स्मशानभूमीतील दैनंदिन देखभाल अशा विविध कामांचा समावेश आहे, असल्याचे श्रद्धा जाधव यांनी सांगितले.

५ ते ७५ लाखांच्या खर्चाच्या कामांची माहिती द्या
महापालिका अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार ५ लाखांहून अधिक ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या मंजूर कामांची किंवा कंत्राटांची माहिती स्थायी समितीला १५ दिवसांत कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे एन विभागातील या कामांच्या खर्चाबाबत प्रशासनाने अधिक स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी श्रद्धा जाधव यांनी केली आहे.

यापूर्वीदेखील अशा प्रकारची कामे करण्यात आली असून श्रद्धा जाधव यांच्या मुद्याबाबत पालिका प्रशासनाने पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.