World Cup 2023 –  सलामीलाच लाखमोलाचे द्वंद्व, जगज्जेते भिडणार स्मार्ट न्यूझीलंडशी

2019 साली आपले पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकावणारा इंग्लंडचा संघ न्यूझीलंडशी भिडतोय. इंग्लंडच्या संघात एकापेक्षा एक स्टार आहेत, तर न्यूझीलंडचा संघच सुपरस्टार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली होणाऱया आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा सलामीचा सामना लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत रंगणार असल्यामुळे मोदी स्टेडियमवर लाखमोलाचे द्वंद्व पाहायला मिळणार यात वाद नाही.

इंग्लंडच्या कामगिरीत तफावत

इंग्लंडचा संघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या ‘ऍशेस’ मालिकेत त्यांनी जो ‘बॅझबॉल’ खेळ केला ते पाहून सारेच भारावले आहेत. तसेच त्यांचा संघ एकापेक्षा एक सुपरस्टार्सने भरलेला आहे. पण गेल्या वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक जेतेपद पटकावल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत ते फारसे वन डे क्रिकेट खेळलेले नाहीत. केवळ 43 सामने ते खेळले असून 22 विजय आणि 16 पराभवांना सामोरे जावे लागलेय. फक्त एकच समाधानाची बाब की, ते नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळलेत आणि ती मालिका त्यांनी 3-1 ने जिंकली होती. त्यामुळे ते न्यूझीलंडपेक्षा सरस आहेत.

प्रथमच वर्ल्ड कपला सव्वा लाख प्रेक्षक

वर्ल्ड कपच्या बहुतांश लढती सोल्ड आऊट झाल्या असल्या तरी सलामीच्या सामन्याची काही हजार तिकिटे अद्याप शिल्लक आहेत. तरीसुद्धा या सामन्याला सव्वा लाखापेक्षा अधिक प्रेक्षक असतील, असा अंदाज आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात 1996 साली झालेल्या उपांत्य सामन्याला एक लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांची गर्दी होती. तो विक्रम आज मोडला जाईल. त्यानंतर 14 ऑक्टोबरला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना नवा विश्वविक्रम प्रस्थापित करेल, असाही विश्वास आयोजकांना आहे.

विल्यमसन, स्टोक्सबाबत साशंकता

अनफिट असूनही संघात असलेला केन विल्यमसन फिट असला तरी सलामीचा सामना खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. तसेच बेन स्टोक्सबाबतही साशंकता आहे. त्यामुळे सलामीचा सामना दिग्गजांशिवाय खेळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही कोणत्याही खेळाडूबाबत धोका पत्करणार नसल्याचे संकेत  जोस बटलरने दिले. जो फिट असेल तोच संघात असेल. इंग्लंडच्या संघात सगळेच फॉर्मात असल्यामुळे त्यांना बेस्ट संघ खेळविण्यासाठी फार अडचण होणार नाही. दुसरीकडे न्यूझीलंडही आपल्या फॉर्मातील खेळाडूंनाच प्राधान्य देणार आहे. गेल्या वर्ल्ड कपमधील 9 खेळाडू इंग्लंडने तर 8 खेळाडू न्यूझीलंडने कायम ठेवले आहेत. दोघांनीही संघ निवड फार मोठा धोका पत्करलेला नाही.

सर्वाधिक गर्दीचा वर्ल्ड कप

तेरावा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप हा आजवरचा सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला वर्ल्ड कप ठरणार आहे. हिंदुस्थानातील दहा सर्वांगसुंदर स्टेडियम्सवर पुढील 46 दिवस 46 सामने खेळले जाणार आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही केवळ दहाच संघ खेळले जाणार असल्यामुळे प्रत्येक सामना चुरशीचा आणि गर्दीचा असेल, असा विश्वास आयोजकांना आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात आयोजित केला जाणारा हा चौथा वर्ल्ड कप (1987, 1996, 2011, 2023) आहे आणि यंदा बीसीसीआय स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करत आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडपाठोपाठ हिंदुस्थानच असा आयोजक आहे जो स्वतंत्रपणे आयोजन करतोय. आतापर्यंत इंग्लंडमध्ये पाच वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले असून हिंदुस्थानात हा चौथाच वर्ल्ड कप आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दोनदा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे.

इंग्लंड संघ जोस बटलर (कर्णधार-यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टॉ, हॅरी ब्रुक, डेव्हिड मलान, जो रूट, मोईन अली, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस व्होक्स, गस ऍटकिन्सन, आदिल राशीद, रीक टॉपले, मार्क वूड.

न्यूझीलंड केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, ग्लेन फिलीप्स, विल यंग, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल सॅण्टनर, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, इश सोधी, टीम साऊथी.