
गेल्या 75 वर्षांपासून मंदिरातील प्रसाद, तांदूळ, गूळ खाऊन जगणाऱ्या जगातल्या पहिल्या शाकाहारी बाबिया या मगरीचे निधन झाले. केरळमधील कासरगोड जिह्यातील श्री अनंत पद्मनाभस्वामी मंदिर परिसरातील तलावात ही मगर राहत होती. मंदिर प्रशासनाने हिंदू धर्माप्रमाणे तिची अंत्ययात्रा काढून विधिवत दफन करण्यात आले.
कासरगोड जिह्यातील श्री अनंत पद्मनाभस्वामी मंदिर परिसरातील सरोवरात राहणारी ही बाबिया मगर शनिवारपासून बेपत्ता होती. रविवारी रात्री साडेअकराला तिचे शव तलावात तरंगत असल्याचे दिसले. मंदिर प्रशासनाने याची माहिती पशुपालन विभाग आणि पोलिसांना दिली. बाबियाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजातील मान्यवरांबरोबर राजकारणी आणि सर्वसामान्यांनी मोठी गर्दी केली होती.
दिवसातून दोन वेळा देवाचे दर्शन घ्यायची
बाबिया ही मगर पूर्णपणे शाकाहारी होती. तलावातील मासे किंवा अन्य जलचर ती खात नव्हती. तलावाजवळच्या गुहेत राहत होती. दिवसातून दोन वेळा देवाचे दर्शन घ्यायला मंदिरात येत होती. त्यानंतर ती पुन्हा तलावात किंवा गुहेत जाऊन आराम करत होती. दर्शनाला येणारे भाविक तिला हाताने प्रसाद, तांदूळ, गूळ खाऊ घालत. या मगरीने आतापर्यंत कोणत्याही भाविकाला कधीच दुखापत केली नाही, अशी माहिती मंदिरातील पुजाऱयांनी दिली.




























































