गुजरातविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना मुंबईचे झेंडे फडकवण्यास बंदी, WPL दरम्यानचा धक्कादायक प्रकार

महिला प्रीमियर लीगमध्ये रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर यंदाच्या हंगामातील तिसरा सामना रंगला. या लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईने गुजरातचा 5 विकेट्सने दारुण पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. हरमनप्रीतने षटकार ठोकत मुंबईला विजयी केले.

चिन्नास्वामी मैदानावरील हा सामना पाहण्यासाठी गुजरात आणि मुंबईच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दोन्हीकडचे चाहते आपल्या आवडत्या संघाचे झेंडे हातात घेऊन, जर्सी घालून मैदानात आले होते. मात्र या लढतीदरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्कादायक अनुभव आला. मैदानावरील स्वयंसेवकांनी मुंबईच्या चाहत्यांना मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकवण्यापासून रोखले. तसेच चाहत्यांच्या हातातून हे झेंडे हिसकावून घेण्यात आले. हा सर्व प्रकार चाहत्यांनी कॅमेऱ्यात कैद केला असून याचे व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर व्हायरल झाले आहेत.

पियूष नाथानी नावाच्या एका एक्स युजरने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, येथे गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील महिला प्रीमियर लीगचा सामना खेळला जात असून हे स्वयंसेवक मुंबई इंडियन्सचे झेंडे काढून घेत आहेत. आम्हाला धमक्या देत आहेत.

दरम्यान, युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वयंसेवक उद्दामपणे म्हणतो की, तुम्हाला व्हिडीओ शेकॉर्ड करायचा असेल तर करा. पण यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये एम. चिन्नास्वामी मैदान गुजरात जायंट्सचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे तुमच्याकडे मुंबई इंडियन्सचा झेंडा नको. तर आणखी एका युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वयंसेवक मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या हातातून झेंडे काढून घेताना दिसत आहे. या प्रकारामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, यंदा महिला प्रीमियर लीगचे सर्व सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी आणि दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होत आहेत. 23 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून 17 मार्चला अंतिम सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे पाच संघ जेतेपदासाठी लढताना दिसतील.