जालन्यातील कोपर्डा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील भगवान शंकरराव पाबळे (30) या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी, 20 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भगवान पाबळे हा आपल्या शेतात कुटूंबियांसोबत राहत होता. घरची परिस्थिती बेताची होती. जमीन कमी असल्याने दररोज मजुरीचे आणि ऊसतोडीचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. आर्थिक विवंचनेमुळे सतत येणारी संकटे शिवाय सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे काम मिळेनासे झाले होते. पाबळे यांनी काही कर्जही काढले होते. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या चिंतेने त्याला ग्रासले होतेय

अशा दयनीय परिस्थितीत असताना एक दिवस घराशेजारी राहात असलेल्या आपल्या चुलत बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूलाच असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरी बांधून भगवान पाबळ याने गळफास घेतला. शेतात बांधलेल्या गाईचे दावे सोडून ते आत्महत्या करण्यासाठी वापरले. गाय कशी काय सुटली म्हणून घरचे पाहण्यासाठी गेले असता भगवानने गळफास घेतल्याचे दिसून आले. आरडाओरडा झाल्यानंतर सर्वजण धावले व तात्काळ त्यास भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बुधवार, 21 रोजी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोपर्डा येथे या तरुणावर कोपर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भोकरदन पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. भगवान पाबळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.