तरुणाचा खून करून मृतदेह पेटवला, संभाजीनगरच्या खडकी डोंगर येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीस वर्षीय तरुणाच्या शरीरावर धार धार शस्त्राने वर करून त्याची हत्या केल्याचा प्रकार संभाजीनगरमध्ये घडला आहे. हत्या केल्यानंतर तरुणाचा मृतदेह पेटवून देण्यात आला आहे. संभाजीनगरच्या बेगमपूर हद्दीतील खडकी डोंगराजवळ शेतात रविवारी पहाटे चारच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली.

बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी डोंगराजवळ असलेल्या लच्छू पैलवान यांच्या शेतात रविवारी मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास एका तीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह शेतात आणून टाकला. यावेळी मारेकर्‍यांनी मृतदेह पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत असणारा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. या मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे असून पैशाच्या वादातून हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.