सुखी संसाराचे स्वप्न मोडले, लग्नाआधीच तरुणीने प्रियकरासोबत घेतली फाशी !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुखी संसाराची गोड स्वप्ने बघणाऱ्या एका तरुणीने लग्नापूर्वीच प्रियकरासोबत आपले आयुष्य संपवले. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवस आधीच त्या दोघांनी फाशी घेतली.

कानपूर येथील चौबेपूर गावात राहणारे सुनील यांची मुलगी सोनी. हिचे याच गावात राहणाऱ्या शिव नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. पण सोनीच्या कुटुंबीयांचा त्यांच्या या प्रेमसंबंधाला विरोध होता. सोनी आणि शिवचे एकमेकांना भेटणेही त्यांना आवडत नव्हते. तिच्या नातेवाईकांचाही यांच्या नात्याला प्रचंड विरोध होता. सोनीचे लग्न त्यांच्या ईच्छेने व्हावे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी बिल्हौरमधील झांसी नवादा गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचे लग्न ठरवले.

30 मार्चला तिचे लग्न होते. 28 मार्चला मेहंदी लावण्याचा कार्यक्रम होता. घरात लग्नाची धामधूम सुरू होती. संगीतमय वातावरणात सोनीचा मेहंदी सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री ती तिच्या खोलीत गेली, मात्र पुन्हा खोलीबाहेर येताना कोणीच पाहिले नाही. सोमवारी गावातील कमल कटिहार यांच्या शेतात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला सोनी आणि शिवचा मृतदेह लटकताना गावकऱ्यांनी पाहिला.

गावकऱ्यांनी चौबेपूर पोलिसांनी ही घटना सांगितली. तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहिले की, दोघांनीही एकाच दोरीच्या साहाय्याने फाशी घेतली होती तसेच सोनीचे प्रेत झाडावरून खाली उतरवले तेव्हा तिच्या भांगात कुंकू भरलेले पोलिसांना दिसले. त्यामुळे फाशी घेण्यापूर्वी शिवने तिच्या भांगात कुंकू भरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून या दोघांविषयी माहिती घेऊन त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत.