हीच ती वेळ, युवासैनिकांनो उठा! पूरग्रस्तांना  मदत करा!! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे–जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा.

राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आवाहन केले आहे. ‘हीच ती वेळ’ असे सांगत त्यांनी पूरग्रस्त भागांमध्ये शक्य ती मदत तातडीने पोहोचवा अशा सूचना युवासैनिकांना केल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करत युवासैनिकांना हे आवाहन केले आहे. ‘युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे-जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदतकार्य करा. सर्वसामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याची हीच ती वेळ आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. यापूर्वी राज्यात जेव्हा जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली होती तेव्हा तेव्हा पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सर्वात आधी शिवसैनिक आणि युवासैनिक धावून गेले होते.