रातोरात 14 हिंदू मंदिरे पाडली, मूर्ती तलावात फेकल्या; बांगलादेशात तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बांगलादेशातील 14 हिंदू मंदिरांची तोडफोड करून मंदिरातील मुर्त्या तलावात फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. अज्ञात लोकांनी रात्री मंदिरांवर हल्ले करत मूर्तींची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये काही मूर्ती नष्ट झाल्या आहेत, तर काही मूर्ती मंदिराजवळील तलावांमध्ये सापडल्या आहेत. दरम्यान हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र आरोपींना लवकरात लवकर पकडले जावे, अशी मागणी बांगलादेशातील हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबद्दल बांगलादेशातील हिंदू समुदायाचे नेते आणि संघ परिषदेचे अध्यक्ष समर चॅटर्जी म्हणाले की, हल्ला करण्यात आलेला परिसर नेहमीच आंतरधर्मीय सौहार्दाचा परिसर म्हणून ओळखला जातो. कारण याआधी अशी कोणतीही घटना येथे घडली नव्हती. ते म्हणाले की मुस्लिम समुदायाचा आमच्याशी कोणताही वाद नाही. मात्र या हल्ल्यामागे कोणाचा हात असू शकतो हे आम्हाला समजू शकलेले नाही.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे अनेक गावांमध्ये हल्ले झाले. देशातील शांतता बिघडवण्यासाठी हा सुनियोजित हल्ला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला आहे.