
अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयामार्फत शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईचे धाड सत्र सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतील कारवाईत 6,980 आणि संगमेश्वरमधील कारवाईत 15,665 असा एकूण 22,645 रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
निवळी फाटा, रत्नागिरी येथील मे. स्वामी समर्थ पानशॉप, निवळीफाटा रत्नागिरी, रवळनाथ पानशॉप निवळी फाटा रत्नागिरी या दोन ठिकाणी प्रशासनामार्फत धाडी टाकून अनुक्रमे 4,830 व 2,150 रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही विक्रेत्यांविरुद्ध रत्नागिरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याचप्रमाणे संगमेश्वर येथील मे. सप्रे पानशॉप या दुकानावर धाड टाकून 15,665 रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून या विक्रेत्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस स्थानकात प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून या प्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांच्या नेतृत्वाखाली दशरथ बांबळे, प्रशांत गुंजाळ, विजय पाचपुते अन्न सुरक्षा अधिकारी, रत्नागिरी यांच्या पथकाने केली. तसेच अन्न कोकण विभाग ठाणेचे सह.आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अभिमन्यू काळे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार यापुढेही प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करण्यात येणार असून याबाबत काही माहिती असल्यास जनतेने पुणे कार्यालयास ईमेल [email protected] अथवा 1800-222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




























































