
>> नम्रता पवार
प्लास्टिकचा कचरा हा सध्या सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. हजारो वर्षे नष्ट न होणारं प्लास्टिक खरेतर माणसांप्रमाणेच प्राणी व जलचर यांच्याबरोबरचं सुपीक जमीन नापीक करणारं ठरत आहे. अनेक वर्षांच्या पर्यावरणप्रेमींच्या लढय़ानंतर शेवटी प्लास्टिकच्या समूळ उच्चाटनासाठी अलीकडेच महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी घालण्यात आलीय. गेल्या अनेक वर्षांची प्लास्टिकची ही सवय सोडवणं अर्थातच खूप कठीण जाणार आहे. पण पर्यावरण टिकवणे हे तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाच्याच हाती असते. थोडी जागरूकता आणि शिस्तीचे पालन केले तर ही प्लास्टिकबंदी आपल्याला नक्कीच सोपी जाईल. याबाबत विज्ञानसंवादक आणि पर्यावरणतज्ञ हेमंत लागवणकर यांनी सोपे उपाय सांगितले.
प्लास्टिकचा पर्याय
-आता कंदमुळापासून बनविलेल्या पिशव्या आल्यात. त्या प्लास्टिकच्या वाटल्या तरी त्यावर ‘I am not plastic’ असं लिहिलेलं आहे. या पिशव्या काही तासातच पाण्यात विरघळतात आणि चुकून प्राण्यांच्या पोटात गेल्यास अपाय होत नाही.
-जुन्या साडय़ा, ड्रेस, ओढण्या, जीन्सपासून या पिशव्या घरच्या घरी सहजपणे तयार करता येतात तसंच पर्समध्ये सहजपणे ही पिशवी ठेवता येते. ज्यूट, मांजरपाट, कॅनव्हास कापड यापासून या पिशव्यादेखील तयार करता येतात.
-पळस आणि मोह यांच्या पानांपासून पत्रावळ्या व द्रोण उपलब्ध आहेत. यांचा वापर झाल्यावर यापासून खतनिर्मिती होते. तसेच जनावरांच्या पोटात गेल्यास कोणताही अपाय होत नाही. यामुळे आरोग्य निरोगी राहण्याबरोबरच पर्यावरणदेखील सुरक्षित राहतं.
जनजागृती गरजेची
-आपल्याकडे प्लास्टिकचा वापर वाढला तो स्वतःच्या सोयीसाठी. प्लास्टिक मुळात वाईट नाहीये, परंतु ते विघटनशील नसल्यामुळे तसंच आपल्याकडची वाढती लोकसंख्या आणि प्लास्टिकचा बेसुमार वापर व बेशिस्तपणा यामुळे हा वाढला आणि यामुळे निसर्गाची अधिक हानी झाली.
-परदेशातदेखील प्लास्टिकचा वापर होतो, परंतु तिथे लोकसंख्या कमी. लोकांमध्ये शिस्त आहे. नियम काटेकोरपणे पाळले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचं वेस्ट मॅनेजमेंट होतं. आपल्याकडे अशा प्रकारच्या सुविधा आहेत हेच मुळी लोकांना माहीत नाहीये. अनेकदा पालिकेचे हे प्लान्ट बंद स्थितीत असतात.
-आपण ज्या कापडी पिशव्या वापरणार म्हणतो त्यादेखील बायोडिग्रिडेबल नाहीयेत. त्यामध्ये प्लास्टिक कंटेट आहेत. कागदी पिशव्या वापरायच्या म्हटलं तरी बांबूच्या झाडांची कत्तल आलीच. उत्पादन करतेवेळी अधिक प्रदूषण होतं. पाण्याचा अधिक वापर होतो. केमिकल्सचा अधिक वापर होतो. तेवढा प्लास्टिक निर्मितीमध्ये वापर होत नाही.
-प्लास्टिकची बाटली मला सोयीची आहे म्हणून मी ती वापरणं ठीक आहे परंतु तिचा वापर झाल्यानंतर ती पुन्हा रस्त्याच्या कडेला रेल्वेच्या रुळांवर फेकून देणे चुकीचे आहे. यासाठी स्वतःहून शिस्त लावून घेणं गरजेचं आहे.
घरापासून सुरुवात
प्रत्येक गृहीणीने स्वतःहून प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा. प्लास्टिक डब्यांपेक्षा काचेच्या बाटल्यांचा वापर करावा. कारण काचेच्या बाटल्यातील पदार्थात रासायनिक प्रक्रिया होत नाही. आरोग्यावर काचेचा कोणताही परिणाम होत नाही. घराबाहेर पडताना कापडी पिशवी, स्टिलचा डबा सोबत ठेवावा. खरंतर या गोष्टी अंगवळणी पडणे सुरुवातीला नक्कीच कठीण जाणार आहे. परंतु स्वतःच्या आणि भावी पिढीच्या आरोग्यासाठी स्वतःहून पाऊल उचलणं नक्कीच स्वागतार्ह आहे.




























































