शासकीय वसतिगृहात मुलींना सडके व बुरशी आलेलं अन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुदाम वराट । जामखेड

शहरातील शासकीय मुलींच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना सडके व बुरशी आलेले अन्न, पिण्यासाठी अस्वच्छ पाणी मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतिगृहाचे टेंडर घेणारा धुळे येथील ठेकेदार येथे फिरकतही नसल्याचे निदर्शनास आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खराब अन्नाबाबत मुलींनी तहसीलदारांकडे आपली कैफियत मांडली आहे. या तक्रारीनंतर तहसीलदारविशाल नाईकवडे यांनी वसतिगृहात जाऊन प्रत्यक्ष प्रकार पाहिला आणि वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल असे सांगितले.

jamkhed-vasati01

जामखेड येथील शासकीय मुलींचे वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, विविध सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्रस्त झालेल्या मुलींनी आपली कैफियत तहसीलदार यांच्याकडे मांडली. तहसीलदार यांनी या वस्तीगृहाला भेट देऊन याबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले. येथील सदाफुले वस्ती परिसरात मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह आहे. या वस्तीगृहात राहणाऱ्या मुली तहसील कार्यालयात आल्या. त्यांनी तहसीलदांपुढे आपली कैफियत मांडली. वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नाही, फळे मिळत नाही, मासीक भत्ता सहा महिन्यांनी मिळतो, स्टेशनरी भेटत नाही, गरम पाणी मिळत नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही याबाबत वस्तीगृह अधिक्षक व समाज कल्याण अधिकारी यांना मुलींनी निवेदन दिले. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. आम्ही आजारी पडलो आता तुम्हीच दखल घ्यावी असे साकडे मुलींनी तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्याकडे घातले व निवेदन दिले.