
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘ठाकरे’ चित्रपट बघणे हा एक अनुभव आहे. तो असा शब्दांत सांगता येणार नाही. तो प्रत्यक्षात पडद्यावर बघा अशा भावना व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ‘ठाकरे’ टीमचे कौतुक केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट उद्या, 25 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग बुधवारी आयनॉक्स ऑट्रिया मॉल, वरळी येथे झाले. ठाकरे कुटुंबासह सिने आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या खास स्क्रीनिंगसाठी खास उपस्थिती दर्शवली. चित्रपट बघितल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी ठाकरे नुसते बघितले नाहीत तर चांगल्या पद्धतीने अनुभवले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट काढणे म्हणजे आभाळाला कॅनव्हासवर उतरवण्याचे आव्हानच जणू. निर्माते संजय राऊत यांनी हे आव्हान लीलया पेलले आहे.
‘ठाकरे’च्या स्पेशल स्क्रीनिंगला सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, अभिनेत्री अमृता राव, दिग्दर्शक अभिजित पानसे, सुजित सरकार, रोहित शेट्टी, मधुर भांडारकर, गायक सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, ऍडगुरू भरत दाभोळकर, शिल्पा तुळसकर, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, संगीतकार रोहन- रोहन, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, माजी संरक्षणमंत्री सुशीलकुमार शिंदे, निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान, खासदार अनिल देसाई, मंत्री एकनाथ शिंदे, आमदार नीलम गोऱहे, सुनील राऊत, सुनील शिंदे, राज्यमंत्री रवींद्र वायकर, वायकॉम 18 चे सीओओ अजित अंधारे, बिझनेस हेड निखिल साने, कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीकांत भसी, वर्षा राऊत, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत, विधिता राऊत आदी उपस्थित होते.
नवाजुद्दीनचा अभिनय अप्रतिम
‘ठाकरे’ चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन याने शिवसेनाप्रमुखांची अप्रतिम भूमिका साकारली आहे. त्याचे केवळ दिसणंच नव्हे तर आवाज, शब्दफेक, हाताची मूव्हमेंट, एकंदरीत संपूर्ण देहबोलीच बाळासाहेबांशी साधर्म्य साधणारी आहे.
हा फ्रायडे खूप खास आहे
‘ठाकरे’ चित्रपटाबद्दल सगळीकडे प्रेक्षकांची उत्कंठता बघून मी थक्क झाले आहे. महाराष्ट्राबाहेर चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही. हा फ्रायडे माझ्यासाठी साधासुधा नाही. मी ‘ठाकरे’मध्ये काम केलंय याचा अभिमान वाटतोय.
महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा चित्रपट
‘ठाकरे’ चित्रपटात दाखवलेल्या 1970 ते 90 सालापर्यंतच्या घटनांचा मी साक्षीदार आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटलोय, बोललोय, त्यांचे काम जवळून बघितलंय. ‘ठाकरे’ चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून वसंतराव नाईक यांच्यापर्यंत सर्व इतिहास चित्रपटात आहे. हा केवळ बाळासाहेबांचा इतिहास नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.
दिल्लीतही स्पेशल स्क्रीनिंग
‘ठाकरे’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग दिल्ली येथेही होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी दिली. दिल्लीतील स्पेशल स्क्रीनिंगला पंतप्रधान, राष्ट्रपती, राहुल गांधी, प्रियंका गांधी या सगळयांना निमंत्रित केले जाईल. एकवेळ राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनता येईल, पण बाळासाहेब ठाकरे बनणे हे खूप कठीण आणि संघर्षमय आहे हे सर्वांना समजले पाहिजे. देशातील जनतेने बाळासाहेबांसारख्या सुपरहीरोचे जसे नेहमीच स्वागत केले तसेच ते पडद्यावरच्या बाळासाहेबांचेही करतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.




























































