श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींची बॅनरबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदगाव

आजपर्यंत मंत्रीमहोदयांबरोबर घेतलेल्या पंधरा बैठकांतील सहभागामुळे नार-पार प्रकल्पात नांदगावचा समावेश झाला. मात्र आता लोकप्रतिनिधी नांदगावात बॅनरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप नार-पारचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी केला आहे.

येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रवीण निकम, डॉ. प्रभाकर पवार, उदय पाटील उपस्थित होते. या सर्वांनी नार-पारप्रश्नी शहरात लावलेल्या बॅनरबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली. नार-पार दमणगंगा नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा म्हणून आम्ही सतत पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना साकडे घालत आजपर्यंत पंधरा बैठका यासंदर्भात घेतल्या गेल्या. त्यात आमचा सहभाग असल्याचा परिणाम म्हणून नार-पार प्रकल्पात नांदगावचा समावेश झाला असल्याचे पाटील यांनी सांगून एरवी तालुक्याच्या मतदारसंघाच्या सार्वजनिक प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा आपला कृतिशील सहभाग न दाखविणारे लोकप्रतिनिधी न झालेल्या कामांबाबत डिजिटल फलकबाजी करत आहेत. आम्ही पाणीप्रश्नाचे राजकारण कसोशीने टाळले. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडणुकांच्या तोंडावर हा मोह टाळता आला नाही. पाणीप्रश्नावरची लढाई सगळ्यांनी मिळून करायची असते.

दोन वर्षे केंद्रापासून राज्यपातळीपर्यंत अभियांत्रिकीपद्धतीने नार-पारचा पाठपुरावा केल्यामुळेच हे यश हाती आल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. यावेळी पाटील यांनी केंद्रीय व राज्यस्तरावरील मंत्री व अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकांचा व लेखी आश्वासनाचा लेखाजोखाच सादर केला.