
सामना ऑनलाईन, पाटणा
बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या वाटपात ‘महाआघाडी’त डाव्या पक्षांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाकप, माकप आणि भाकप (मार्क्स-लेनिनवादी) या पक्षांनी 15 जागा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. बिहारमधील ‘महाआघाडी’ची सूत्रे काँगेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या हाती एकवटली आहेत. महाआघाडीच्या जागावाटपावर समाधानकारक समझोता झाला नाही तर डावे पक्ष एकजुटीने निवडणूक रिंगणात उतरतील, असे भाकपचे राज्य सचिव कुणाल यांनी सांगितले. तर, भाजपला पराभूत करायचे असेल तर डावे आणि धर्मनिरपेक्षतावादी पक्षांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे, असे मत कम्युनिस्ट नेते सत्यनारायण सिंग यांनी व्यक्त केले आहे.




























































