
>> मलिका अमरशेख
‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवती भारत’… तद्वत जेव्हा जेव्हा संपूर्ण मानवाला अहंभाव न् पराकोटीची असहिष्णुता याची ग्लानी यईल तेव्हा तेव्हा असं संकट उभं राहील, की झडझडून जागी होऊन सर्व मानवजात एकत्र येणं ही एकमेव जगण्याची अट होऊन जाईल. पुन्हा एकवार हातात हात घालून लढय़ाला सिद्ध होईल. असत् विरुद्ध सत्, अंधार विरुद्ध प्रकाश, आजार विरुद्ध निरामय आरोग्य…
कोरोना… या शब्दानं अख्ख्या जगाला हलवलं… हादरवलंय… अणुबॉम्ब… पहिलं, दुसरं महायुद्ध याने पण जग इतकं धास्तावलं नव्हतं. कारण जगाच्या काही भागांवरच संकट होतं. पण आता कोरोनानं सगळय़ा जगालाच आपल्या कराल जबडय़ात घेतलेलं… महाबलाढय़ राष्ट्र… अप्रगत राष्ट्र… काळे-गोरे, श्रीमंत-गरीब त्याला सगळेच सारखे. स्मशानात जागा कमी पडू लागली. हॉस्पिटल्स फुल्लं झाली. किडय़ामुंग्यांसारखी माणसं मरू लागली. न पृथ्वीवरून मानव जात नष्ट होणार की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, पण माणसानं या भयानक संकटात पण आपली माणुसकी जपली.
रोजगार बुडाला, कामधंदा-व्यवसाय ठप्प पडले, हातांना काम नाही. घरात बसून उपाशी मरणार. बाहेर पडावं तर कोरोनानं मरणार… अशा परिस्थितीत शासनानं जसे काही योग्य निर्णय घेतले तसेच स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना यामधले हजारो तरुण कोविडयोद्धा म्हणून पुढे सरसावले. लाखो लोकांना रेशन, धान्यवाटप व जेवण घरपोच देऊ लागले. काहींनी औषधे, रक्त आदींसाठी हात दिला. संकटात मुंबईकरांचं स्पिरिट हे एखाद्या संसर्गाइतकंच पॉजिटिव्हली व्यापक आहे. मग पूर असो, बॉम्बस्फोट असो वा कोरोना… सगळे जमेल तसे एकमेकांना मदत करतात.
लॉकडाऊन झालं तेव्हा हजारो मजुरांनी गावचा रस्ता धरला. पायीच हजारो मैल चालणारे आपले दुर्दैव जीव… लहान मुले, गरोदर स्त्रिया ते म्हातारे आईबाप यांना खांद्यावर घेऊन… पण त्यांना वाटेत अन्न, पाणी, बिस्किटे, जेवण घेऊन कोविडयोद्धे उभे होते. एरव्ही करडय़ा खाकी वर्दीचं वर्तन विवादास्पद असतं. तरी यामध्ये अनवाणी स्वावलंबी पायांना मलम लावून देण्याचं सहकार्यही काहीजणांनी केलं. टीव्ही, पेपर, मीडियावरच्या बातम्या व क्लिप्स बघून घरात बसलेले धास्तावले होते.
‘जात्यातले रडतात, सुपातले हसतात’ अशी मराठीत म्हण आहे, पण आता जात्यातले न् सुपातले पण रडतायत अशी वेळ.
सगळं जग अभूतपूर्वपणे एक झालंय… मला वाटतं, ही मानवी इतिहासातली पहिलीच वेळ असेल. न पेक्षा एक दुसऱयावर कुरघोडी अन् शरसंधान करायला टपून बसलेली राष्ट्रं एकदुसऱयासाठी लस व मदत विचारू लागले.
महानगरात राहणारे, फ्लॅट संस्कृतीत वाढणारे लोक… ज्यांना शेजारी कोण राहतो याचा पत्ता नसलेले आता मास्कआडून फोनवरून किंवा बाजारात जाताना एकदुसऱयाची विचारणा करू लागले.
तर काहींनी स्वयंशिस्त लावून घेतली. काही जण घरात पत्नीला चक्क मदत करू लागले. कामं वाटून घेतली गेली. काही सोसायटय़ांमधून तर घरकामाला येणाऱया स्त्रिया, ड्रायव्हर यांची मोफत तपासणी करू दिली, तर प्रत्येक घरातून एक माणूस जाण्याऐवजी सोसायटीतर्फे एकच माणूस जाऊन प्रत्येक घराची वाणसामान यादी देऊन येऊ लागला. नियोजन, शिस्त आणि संयम या त्रिसूत्री यामुळे पहिल्या लॉकडाऊननंतर कोरोनाचा जोर कमी झाला न् साखळदंडानं बद्ध राहिलेल्या लोकांनी हातपाय अंमळ सैल केल्याबरोबर ‘मी गेलो नाही बरं का’, ‘मी पुन्हा येणार म्हणालो होतो ना!’ असं म्हणून पुन्हा कोरोना मृत्युघंटा वाजवत हजर झाला. टाळय़ा वाजवून झाल्या, दिवे पेटवून झाले, पण कोरोना काही जाईना. माणसाच्या हिमतीची न् माणुसकीची परीक्षाच चाललेली… एकाच समान पातळीवर आणून ठेवलं गेलं जगणं किंवा मरणं…
कोरोना झालाच तरी आपण उद्या कुठल्या यादीत जाणार? जगणाऱयाच्या की मरणाऱयाच्या? हॅम्लेट म्हणाला होता, ‘to be or not be?’ ‘जगावं की मरावं हा एकच प्रश्न…’ कोरोना पण सकल मानवजातीला एकच प्रश्न विचारतोय, ‘जगायचंय की मरायचंय?’ जगायचं असेल तर नियम पाळा. माणुसकीनं वागा… फक्त मानवाशी माणुसकीनं वागा इतकाच सीमित अर्थ नाहीय, तर चराचराबरोबर, निसर्गाबरोबर माणुसकीनं वागा… वारेमाप जंगलतोड, स्वतःच्या विकृत स्वार्थापोटी पशूपक्षी यांची हिंसा, विकासाच्या नावाखाली जंगल, समुद्र यांच्या जागेवर अतिक्रमण आणि मग नंतर ऋतुचक्राचा समतोल ढासळला की अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ ओला-सुका यांसारख्या आपत्त्या आल्या की मग रडत बसणार. माणसाला बदलायला ही एक संधी दिली गेलीय. फक्त माणुसकीनं वागून आपण यातून तरून जाऊ शकत नाही. चंद्र-मंगळ चाचपून बघायचं कारण नाही. तिथंही गेलो तरी आपण याच चुका करणार असू तर तिथंही ‘मंगोला’ येईल. निसर्गाचा बॅलन्स बिघडला की आपत्त्या येतात न् त्या निसर्गनिर्मित सकृत्दर्शनी दिसत असल्या तरी त्या मानवनिर्मितीच असतात. (त्याच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या)
‘काय आहे आणि काय असावं’ यातला फरक जाणणारा तो माणूस. सजग आणि मानवीय भावनेनं ओतप्रोत माणुसकी जपणारा माणूस. नव्या पिढीला आदर्श देणारा माणूस. संस्कार न् उदात्त विचार देणारा माणूस टिकला पाहिजे.
‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवती भारत’… तद्वत जेव्हा जेव्हा संपूर्ण मानवाला अहंभाव न् पराकोटीचा असहिष्णुता याची ग्लानी यईल तेव्हा तेव्हा असं संकट उभं राहील, की झडझडून जागे होऊन सर्व मानवजात एकत्र येणं ही एकमेव जगण्याची अट होऊन जाईल. पुन्हा एकवार हातात हात घालून लढय़ाला सिद्ध होईल. असत् विरुद्ध सत्, अंधार विरुद्ध प्रकाश, आजार विरुद्ध निरामय आरोग्य… या लेखाचा शेवट माझ्याच कवितेनं करते.
‘शून्यात बदलली दुनिया सारी
चिताच जळती दारोदारी
खिन्न दुरावा असा अंतरी
अर्थही सरला शब्द काजळी
काळ मोजतो अंक मृतांचे
देणे देतो मरण भयाचे
नाव सुबत्ता लौकिक कुठचे
एक ढिगारा कण राखेचे
अवकाशाला मस्तक भिडले
पण पाताळी पायही रुतले
गर्व फुकाचा कुठली सत्ता
माणुसकीचा कुणी न त्राता ।।





























































