‘औषधही-अनुशासनही’ हा कानमंत्र देत मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’, मुंबईच्या डॉक्टरशीही साधला संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. आपल्या सर्वांचे कित्येक जिवलग अकालीच आपल्याला सोडून गेले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये खूप मोठी उमेद निर्माण झाली होती, आत्मविश्वासाने देश भारलेला होता, परंतु या कोरोनाच्या वादळाने देशाला हादरवून टाकलं आहे, असे कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, केंद्र सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. देशातले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विरोधात यावेळी खूप मोठ्या लढाईमध्ये गुंतले आहेत, असेही मोदी म्हणाले.

‘औषधही-अनुशासनही’

तसेच एक नागरिक म्हणून आपण आपल्या आयुष्यात जेवढ्या कौशल्याने आपली कर्तव्ये पार पाडू, तेवढ्या लवकर आपण संकटातून मुक्त होत भविष्याच्या आपल्या मार्गांवर तितक्याच वेगाने आपण पुढे जाऊ., असेही मोदी म्हणाले. तसेच सर्वांनी लस घ्यावी आणि पूर्णपणे सतर्कही राहावे, असे आवाहन करत मोदींनी ‘औषधही –अनुशासन ही’ हा मंत्र कधीही विसरायचा नाही, असे म्हटले.

मुंबईच्या डॉक्टर जोशींशी साधला संवाद

कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमात म्हणाले, त्यांनी यावेळी मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला.

डॉ. जोशी देशातील सर्वोत्तम डायबेटोलॉजिस्ट, पद्मश्री आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्स चे सदस्य आहेत. त्यावेळी डॉक्टर शशांक जोशी म्हणाले की, कोरोनाची ही जी दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन- तीन फरक आहेत. पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाहि. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाही.

डॉ जोशी पुढे म्हणाले की “हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडिसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात रहाण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं.”

“ज्यांना प्राणवायुची आवश्यकता आहे, रूग्णालयात दाखल होतात. परंतु डॉक्टर सांगतील तेव्हाच बाहेरून प्राणवायु घेतला पाहिजे. लोकांनी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्राणायाम केला, आपल्या शरिरातल्या फुफ्फुसांना जरासं विस्तारित केलं, आणि शरिरातलं रक्त पातळ करणारी जी इंजेक्शन्स येतात, ती घेतली, या छोट्या छोट्या औषधांनीही 98 टक्के रूग्ण बरे होतात. शिवाय, लोकांनी सकारात्मक रहाणंही खूप आवश्यक आहे. उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महागड्या औषधांच्या मागं धावण्याची काहीच गरज नाही असे देखील डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.

आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करून डॉ जोशी म्हणाले की, देशात रूग्ण बरे होण्याचा सर्वात चांगला रिकव्हरी रेट आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान पुढे म्हणाले की “केंद्र सरकारकडून जो विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, तो पुढेही चालू राहिल, माझा राज्यांना आग्रह आहे की, त्यांनी केंद्र सरकारच्या या विनामूल्य लसीकरण मोहिमेचा फायदा आपल्या राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावा.”