ब्राह्मण आणि बनिया माझ्या खिशात, भाजप प्रभारींचं वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murlidhar-rao-bjp

माझ्या एका खिशात ब्राह्मण आणि दुसऱ्या खिशात बनिया आहेत असं वादग्रस्त विधान भाजपच्या प्रभारींनी केल्यानंतर भाजप अडचणीत आली आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपला यावरून घेरलं असून हा दोन्ही समाजांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

भाजपचे मध्य प्रदेशचे प्रभारी मुरलीधर राव यांनी असं विधान केलं आहे ज्यामुळे त्यांनी वाद ओढावून घेतला आहे. सोमवारी मुरलीधर राव यांनी सांगितले की, ब्राह्मण आणि बनिया त्यांच्या खिशात आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, भाजप जातीच्या आधारावर मतं मागत आहे का?

सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान मुरलीधर राव यांनी सांगितलं की, ‘माझ्या एका खिशात ब्राह्मण आणि एका खिशात बनिया आहे. जेव्हा ब्राह्मण कार्यकर्ता होते तेव्हा या पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हटलं जात होतं. जेव्हा बनिया कार्यकर्ते होते तेव्हा या पक्षाला बनियांचा पक्ष म्हटलं गेलं. भाजपहा सगळ्यांचा पक्ष आहे.’

ब्राह्मण आणि बनिया यांसदर्भातील त्यांच्या दाव्यानंतर वाद उभा राहिला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेचे नेते कमलनाथ यांनी हा ब्राह्मण आणि बनियांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘सबका साथ सबका विकास अशी घोषणा देणारे आज विशिष्ट वर्गाला फोकस करत आहेत. इतकंच नाही तर त्यांचा सार्वजनिक अपमान करत आहे. सत्तेच्या लोभा पायी भाजप कुठल्या थराला गेला आहे.’

कमलनाथ यांनी आपल्या पुढल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, ‘भाजपला उभे करण्यात ज्या वर्गांनी भूमिका निभावली त्यांचा हा असा सन्मान म्हणावा का? भाजप सत्तेच्या नशेत आणि अहंकारात बुडाला आहे. हा संपूर्ण ब्राह्मण आणि बनिया वर्गाचा अपमान आहे.’