
आयफोनच्या किमती जास्त असतात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. एखादा जुना आयफोन 64 लाख रुपयांना विकला गेला, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण असं घडलंय. 2017 सालच्या आयफोनला एवढी मोठी बोली लागलेय. यामागचे कारणही तेवढेच रंजक आहे. हा आयफोन साधासुधा नसून टाईप सी चार्जिंग सॉकेटवाला तो पहिला आयफोन ठरलाय.
ऍपल कंपनीने ‘आयफोन एक्स’ चार वर्षांपूर्वी लाँच केला होता. या सीरिजमधल्या फोनला एका व्यक्तीने सुमारे 86 हजार यूएस डॉलर्सला म्हणजेच सुमारे 64 लाख रुपयांना विकला आहे. केन पिलोनेल असे करामती इंजिनीयरचे नाव आहे. त्याने आयफोन एक्सला यूएसबी सी पोर्ट बसवलं आहे आणि ते चांगले काम करत आहे. या ऐतिहासिक फोनचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. 1 नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू झाला. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी बोली लागली.
साधारणपणे आयफोनला चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट दिले जाते. आयफोनचे चार्जिंग आणि हेडफोन सॉकेट इतर कोणत्याही फोनपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे आयफोनला इतर कोणताही चार्जर चालत नाही. करामती इंजिनीयरने आयफोनला टाइप-सी सॉकेट बसवून त्यामधून फोन चार्जिंगसह डेटा ट्रान्सफरही करून दाखवले आहे.




























































