कुठे आहात त्याची आधी माहिती द्या, तोपर्यंत सुनावणी नाही! सुप्रीम कोर्टाचा फरार परमबीर सिंह यांना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आज चांगलाच झटका दिला. आपल्याविरुद्धच्या गुन्हेगारी खटल्यांमध्ये अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र ‘तुम्ही कुठे आहात त्याची आधी माहिती द्या, तोपर्यंत सुनावणी होणार नाही’ अशी तंबीच सर्वोच्च न्यायालयाने दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन काwल यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंह यांच्या वकिलाने आज याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती काwल यांनी ‘परमबीर सिंह कुठे आहेत? देशात आहेत की परदेशात? की कोणत्या राज्यात आहेत, नक्की कुठे आहेत?’ असा सवाल त्यांच्या वकिलांना केला आणि सुनावणीस नकार देत 22 नोव्हेंबर ही पुढची तारीख दिली.

‘परमबीर सिंह तपासात सहकार्य करत नाहीत. ते कुठे आहेत याचीही माहिती आम्हाला नाही. वरिष्ठ अधिकारी असूनही ते अशा पद्धतीने लपून बसल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली आहे’ असे न्यायमूर्ती काwल म्हणाले. ‘तुम्ही परदेशात बसला असाल आणि तेथील न्यायालयात जाल, याचा असा अर्थ निघतो की, तेथील न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल दिला तरच तुम्ही देशात परत येणार’ असेही न्यायमूर्ती म्हणाले.

परमबीर सिंह हे गेली अनेक महिने गायब आहेत. ते देशातून पळून परदेशात गेले असावेत असा तपास यंत्रणांना संशय आहे. गोरेगाव खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जानंतर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. गेल्या मे महिन्यात सिंह हे शेवटचे कार्यालयात आले होते आणि त्यानंतर सुट्टीवर गेले. त्यांच्या ठिकाणाबद्दल काहीच माहिती नसल्याचे राज्य पोलिसांनी गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते.

श्वास घेऊ द्याल तर खड्डय़ातून बाहेर येईन

हजर होण्याचे आदेश, लुकआऊट नोटीस, फरार घोषित करणे, मालमत्ता जप्तीसाठी मुदत मिळणे असे एकापाठोपाठ एक कायदेशीर बडगे बसूनही परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. आता तर खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना ‘कुठे आहात?’ अशी विचारणा केल्याने त्यांना उत्तर देणे भाग आहे. आज त्यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले की, ‘मला श्वास घ्यायला परवानगी मिळाली तर खड्डय़ातून बाहेर येईन’. आता 22 नोव्हेंबरला सिंह यांना त्यांच्या ठिकाणाबद्दल नेमकी माहिती न्यायालयाला द्यावी लागणार आहे.

परमबीर सिंह, रियाज भाटी, विनय सिंह या तिघांना तीस दिवसांच्या आत न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. जर ते तिघे न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला जाईल. न्यायालयाच्या आदेशानंतर संपत्ती जप्त होईल.