
प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. मात्र, आपल्या वयापेक्षा दुपटीपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय एका तरुणीने घेतला. लग्नानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात सुखी आहोत, मात्र, लोकांकडून होणाऱ्या टीकेमुळे आणि त्यांच्या विकृत नजरेमुळे त्रास होत असल्याचे तरुणीने सांगितले.
अमेरिकेतील मायने (Maine) शहरात हे जोडपे राहते. एलिझा फोर्ब्ज (Eliza Geaghan-Forbes) असे 22 वर्षांच्या तरुणीचे नाव असून तिने तिच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्याने लोकांच्या टीकेला तिला उत्तरे द्यावी लागत आहेत. रिक फोर्ब्ज (Rick Forbes) असे तिच्या पतीचे नाव असून त्याचे वय 50 वर्षे आहे. आमचे वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाचे आहे. मात्र, लोकांच्या विकृत विचारांचा आम्हाला त्रास होत असल्याचे एलिझाने सांगितले. ‘मेट्रो युके’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आमच्या दोघांच्या वयात 28 वर्षांचे अंतर आहे. त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. आपण रिकसोबत आनंदात जगत आहोत. तो आपल्याला खूश ठेवतो. आपली काळजी घेतो. एखाद्या समवयस्काशी लग्न केले असते तर त्याच्यात अशाप्रकारे काळजी घेण्याची वृत्ती दिसली नसती. समवयस्क जोडीदार नेहमी शारीरिक सुखाच्या दृष्टीनेच तरुणींकडे बघतात. मात्र, रिक शारीरिक सुखापेक्षा भावनांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे त्याच्यासोबत आनंदी असल्याचे एलिझाने सांगितले.
लग्न करण्याआधी लोक, समाज, कुटुंबिय काय म्हणतील, याची काळजी होती. मात्र, आता आपण टीका करणाऱ्यांना सडोतोड प्रत्युत्तरे देतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात काय, तुमचा जोडीदार तुमच्या मनासारखा आहे काय, असे प्रतिप्रश्न केल्यावर टीका करणारे गप्प होतात, असे एलिझा म्हणाली. लग्न करताना वय महत्त्वाचे नसून एकमेकांना समजणे गरजेचे आहे, असे तिने सांगितले.
अनेकदा विकृती लोक खिजवण्यासाठी ते तुझे वडील आहेत का, असे विचारतात. तेव्हा त्यांना आपण सहजपणे ते माझे वडील नसून पती आहेत, असे सांगतो. अशी टीका करणाऱ्यामुळे आधी खूप निराश वाटायचे. मात्र, आता त्यांना कसे गप्प करायचे ते आपल्याला समजल्याचे एलिझाने सांगितले. आमचे नाते वेगळे असून टीका करणाऱ्यांमुळे आम्हाला फरक पडत नसल्याचे ती म्हणाली.
एका पेट्रोल पंपवर काम करताना 4 वर्षांपूर्वी आपली रिकशी ओळख झाली. तेव्हा आपण 18 वर्षांचे आणि रिक 46 वर्षांचा होता. सुरुवातीला रिक आपल्याकडे दुर्लक्ष करत होता. मात्र, त्याच्या भावना आपल्याला समजल्या होत्या. त्यामुळे फेसबुकवर त्याला शोधून आपण लग्नासाठी पुढाकार घेतल्याचे एलिझाने सांगितले. दोन वर्षांपूर्वी आम्ही लग्न केले.आम्हाला दोन मुले आहेत. एक दीड वर्षांचा आणि एक पाच महिन्यांचा आहे. आम्ही वैवाहिक जीवनात खूश आहोत. आम्ही एकमेकांची आणि मुलांची खूप काळजी घेतो. आता आपण मेडिकल असिस्टंटचा अभ्यास करत असून त्यासाठी रिक आपल्याला प्रोत्साहन देत असल्याचेही एलिझाने सांगितले.




























































