
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील 88 दिवसांसाठीच्या पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्य आदी माल विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात शाळांनी मागणी करण्याचे आदेश राज्य शिक्षण संचालकांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या कालखंडात शाळा बंद होत्या. त्या काळातील चार महिन्यांसाठीच्या कार्यदिनाच्या 88 दिवसांसाठीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी तांदूळ प्रतिविद्यार्थी आठ किलो 800 ग्रॅम, मूगडाळ दोन किलो 100 ग्रॅम व मटकी दोन किलो 100 ग्रॅम देण्यात येणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तांदूळ 13 किलो 200 ग्रॅम, मूगडाळ तीन किलो 200 ग्रॅम व मटकी तीन किलो 100 ग्रॅम देण्यात येणार आहे.
शाळांना देण्यात येणारा माल उतरून घेताना शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ावर पुरवठादारांकडून वजन करूनच माल ताब्यात घ्यावा. त्याचबरोबर मालाचा दर्जा, वजन योग्य असल्याची खात्री करावी. तांदळाच्या गोण्यांवर अन्न महामंडळाचा शिक्का असल्याची खात्री करावी. शिक्का नसल्यास मालाचा स्वीकार करू नये.
त्यासंदर्भातील नोंद घेण्यात यावी. माल ताब्यात घेतल्यानंतर कमी आढळून आल्यास त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे. तालुक्यात देण्यात आलेला माल योग्य दर्जाचा असल्याबाबतचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षकांना सादर करावे लागणार आहेत.
न्यूट्रीटिव्ह स्लाईस उपलब्ध होणार
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी, सोयाबीन आदी घटक असलेले स्लाईस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिन्यात सर्वसाधारणपणे 24 दिवस प्रतिदिन पहिली ते पाचवीसाठी 30 ग्रॅम व सहावी ते आठवीसाठी 45 ग्रॅम वजनाच्या स्लाईस देण्यात येणार आहेत. या वितरित करण्यात आल्याच्या नोंदीदेखील घेण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आले आहेत. निर्धारित करून दिलेल्या विद्यार्थ्यांना स्लाईस उपलब्ध करून द्यायचे आहेत. निम्न प्राथमिक स्तरावर ती साडेसात ग्रॅमची चार स्लाईस, तर उच्च प्राथमिक स्तरावर ती सहा स्लाईस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या प्रमाणातच विद्यार्थ्यांना दिले जावेत. याबाबत शिक्षक व पालकांनी दक्षता घ्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.






























































