खंडणी मागणाऱ्या पोलिसांना अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यापाऱ्याकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांना जे. जे. पोलिसांनी अटक केली. विजय गायकवाड आणि सुनील वर्तक अशी त्या दोघांची नावे असून ते जे. जे. पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. खंडणीच्या गुह्यात पोलिसांना अटक झाल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

गिरगाव येथे एक व्यावसायिक राहतात. शनिवारी सकाळी ते त्याच्या चुलत भावासोबत जे. जे. जंक्शन येथून जात होते तेव्हा सहाय्यक फौजदार विजय गायकवाड आणि पोलीस शिपाई सुनील वर्तक याने व्यापाऱ्याला थांबवले. त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. धमकीनंतर व्यापाऱ्याकडून दहा हजार रुपये घेऊन ते दोघे निघून गेले. त्यानंतर व्यावसायिकाने जे. जे. पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गायकवाड आणि वर्तक यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद होताच गायकवाड आणि वर्तकला जे. जे. पोलिसांनी अटक केली.