
विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मांस कापून विल्हेवाट लावत असताना वनविभागाच्या पथकाने धाड टाकली. यावेळी चितळ वन्यप्राण्याचे मांस , हाडे विभागाने जप्त केली. मनोज रामू संदावार ( 35) , वैभव सत्यविजय जीवने ( 42 ) , प्रितम मुंजमकार ( 37),योगेश एकनाथ रामगिरकार ( 3 ) या चार आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. ही घटना चंद्रपूरमधील कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र करंजीमधील बोरगाव परिसरात घडली.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या करंजी उपक्षेत्रातील बोरगाव परिसरात विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाला. मृत चितळाचे शेतातच मांस कापून विल्हेवाट लावत असल्याची माहिती कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस . व्ही . मुरकुटे यांना मिळाली होती. वनअधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाड टाकली. या धाडीत चार जणांना वनविभागाने अटक केली. त्यांच्याकडून चितळाचे मांस , हाडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने शिकार करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.






























































