पश्चिम बंगालमध्ये ‘ईडी’च्या पथकावर जमावाचा हल्ला, गाड्यांची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, त्यांना कोंडीत पकडण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. विरोधी पक्षाचे नेते सातत्याने यावर आवाज उठवतात. मात्र ईडी, सीबीआय आणि आयटीच्या विरोधकांवरील कारवाया सुरुच आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्य़े एक धक्कादायक घटना घडली आहे.

रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड टाकण्यासाठी पोहोचलेल्या ईडीच्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केला आहे. जवळपास 200 हून अधिक लोकांच्या जमावाने ईडी आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला करत गाड्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी ईडीचे पथक उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ( North 24 Parganas district) संदेशखळी (Sandeshkhali) गावामध्ये रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख (Trinamool leader Shah Jahan Sheikh) यांच्या घरावर धाड टाकण्यासाठी गेले होते. मात्र याची खबर लागताच गावकरी गोळा झाले आणि जवळपास 200हून अधिक लोकांच्या जमावाने ईडीच्या पथकावर हल्ला केला.

जमावाने ईडीचे अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. याचे व्हिडीओही समोर आले आहेत.