Maratha Reservation – जरांगे यांच्या समर्थनासाठी आमदारांच्या घरांसमोर ‘आक्रोश’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीनही आमदारांच्या घरांसमोर तीव्र आंदोलन करीत ‘आक्रोश’ करण्यात आला. आंदोलकांनी भाजपचे आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानांसमोर जाऊन आक्रोश केला. घरासमोर ठिय्या मारत आमदारांना जाब विचारला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रथम काळजापूर मारुती मंदिराजवळील भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी आमदार देशमुख आंदोलकांना समोरे जात चर्चा करीत असताना संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत वाद घातला. केंद्रीय मंत्री नारायण राणे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करीत आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. होटगी रोडवरील गांधीनगर येथे राहणारे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यानंतर सातरस्ता परिसरातील प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करीत मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा व अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, अशी मागणी केली. या आंदोलनात सकल मराठा क्रांती मोर्चाचे माउली पवार, रवि मोहिते, प्रकाश वानकर, हेमंत पिंगळे, मतीन बागवान सहभागी झाले होते.

पंढरपुरात रास्ता रोको; वाहतूक ठप्प

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज पंढरपूर मराठा समाजाने शहरातील पंढरपूर-वेणेगाव मार्गावरील भोसे चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे दोन तास वाहतूककोंडी झाली होती. उद्या (शनिवार) पंढरपुरात येणाऱया सर्व मार्गांवर ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी सांगोला मार्गावरील चौथा मैल येथे, मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर चौक येथे, सोलापूर आणि बार्शीकडून येणाऱया मार्गावर नदीपलीकडे तीन रास्ता चौकात, टेंभुर्णी मार्गावर अहिल्यादेवी चौकात, तसेच पुणे आणि सातारा मार्गावर वाखरी येथे, कराड रोडवर टाकळी चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा बांधवांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले. आजच्या बैठकीला सुभाष भोसले, दीपक वाडदेकर, संदीप मांडवे, किरण घाडगे, स्वागत कदम, संतोष कवडे, नागेश भोसले, सतीश गांडुळे, शंकर सुरवसे, सुमित शिंदे, शनी घुले, सुनील पाटील, माउली आटकळे, अविनाश मोरे, मोहन अनपट, धनराज मोरे, अण्णा लटके उपस्थित होते.

‘शेवगाव बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगाव शहर व मराठा समाज, मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने आज ‘शेवगाव बंद’चे आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व व्यवहार बंद होते. मराठा समाजबांधवांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सरसकट आरक्षण देण्याची मागणी मंजूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गवळी यांनी केली.