
आजच्या काळात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (एआय) वापर झपाटय़ाने वाढत आहे. आता तुम्हाला नोकरीत वाढीव पोस्ट, पगारवाढ हवी असेल तर एआयचा वापर करणे बंधनकारक असल्याचे अनेक बडय़ा कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये ‘ऍसेंचर’ या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱयांसाठी ही नवीन अट लागू केली असून यामुळे कॉर्पोरेट विश्वात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षांत ‘ऍसेंचर’ कंपनीने जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. आता तर नोकरी टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांना एआयचा वापर करावा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना एआयचा उत्तम वापर करता येतो, त्यांचीच नोकरी राहील.
आता कंपनीची उत्पादकता पाहता कर्मचारी खरोखर एआय वापरत आहेत की नाही हे तपासण्यासाठी ऍसेंचरने खास यंत्रणा सज्ज केली आहे. कंपनी ‘एआय रिफायनरी’सारख्या इन-हाऊस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या लॉग-इन्सवर लक्ष ठेवणार आहे.
केवळ ऍसेंचर कंपनी नव्हे तर गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांनीही एआय वापराबाबत कडक पावले उचलली आहेत.


























































