
महिला क्रिकेटचा वेग आता अक्षरशः झपाटय़ाने वाढतोय आणि त्याचीच प्रचीती आयसीसीने दिली आहे. आगामी महिला टी-20 विश्वचषकासाठी तब्बल 82 कोटी रुपयांची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर करत आयसीसीने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवली आहे. मागील स्पर्धेपेक्षा ही रक्कम तब्बल 10 टक्क्यांनी अधिक असून महिला क्रिकेटच्या वाढत्या ताकदीचा हा ठोस पुरावा मानला जातो आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 जून ते 5 जुलैदरम्यान रंगणाऱया या महिला महायुद्धात यंदा 12 संघ मैदानात उतरणार आहेत. याआधी 10 संघांचा सहभाग होता. बक्षिसांच्या बाबतीतही आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. विजेत्या संघाला तब्बल 21.8 कोटी रुपये, तर उपविजेत्याला सुमारे 10 कोटी रुपये मिळणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांनाही सुमारे 6.29 कोटींची रक्कम दिली जाईल. इतकेच नव्हे तर, प्रत्येक गट सामन्यातील विजयासाठी जवळपास 29 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला किमान 2.06 कोटी रुपयांची हमी देण्यात आली आहे. या विश्वचषकात हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज यांसारखे दिग्गज संघ उतरतील, तर आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि बांगलादेशसारखे संघही आव्हान उभे करतील. एकूण 33 सामने आणि 24 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे.























































