होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीवरून चीन भडकला; अमेरिकेला हस्तक्षेप न करण्याचा दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी घोषणा केली की, अमेरिकेचे नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणच्या बंदरांकडे जाणारा सागरी मार्ग रोखेल. इराणसोबतची उच्चस्तरीय चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, आता इराण आणि अमेरिकेमधील तणाव अधिक ताणला गेला आहे. परंतु यावर चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेला होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादण्याविरोधात इशारा देऊ केला आहे. चीन आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी दिला आहे. हा इशारा सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता अमेरिकेची नौदल नाकेबंदी सुरू होताच देण्यात आलेला आहे. अॅडमिरल डोंग जून म्हणाले, “आमचे इराणसोबत व्यापारासोबतच उर्जा करार देखील आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, इतर कोणीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. होर्मुझची सामुद्रधुनी चीनसाठी खुली राहील.”

आज तक ने दिलेल्या माहितीनुसार, हा जलमार्ग बीजिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच जलमार्गातून, त्यांच्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ४० टक्के आणि एलएनजीच्या गरजेपैकी ३० टक्के पुरवठा होतो. त्यामुळे या महत्त्वाच्या आखाती जलमार्गाचे संरक्षण करण्यासाठी चीनकडून या युद्धविरामासाठी दबाव आणला जात आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा युद्धविरामाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मंत्रालयाचा युक्तिवाद आहे की, या जलमार्गाची सुरक्षा, स्थिरता आणि वाहतूक आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताची आहे. South China Morning Post यांनी प्रवक्ते गुओ जियाकुन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीतील व्यत्ययाचे कारण इराणशी संबंधित संघर्ष आहे. हा प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लवकरात लवकर युद्धविराम करणे आणि परस्पर वैर संपवणे हा आहे.” ते असेही म्हणाले की, मध्य पूर्वेतील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी चीन सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावण्यासाठी तयार आहे.