
>>दयानंद पाटील<<
बहुप्रतीक्षित डहाणू लोकल 16 एप्रिल 2013 रोजी सुरू झाली. उद्या 16 एप्रिल 2026 रोजी 13 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा या डहाणू लोकलने प्रवाशांना काय दिले? डहाणू लोकल प्रत्यक्षात धावण्यास किती कष्ट आणि प्रयत्न झाले आहेत हे प्रत्येक जण जाणून आहेच आणि रेल्वेच्या कारणांचा भडिमारसुद्धा सहन करावा लागला आहे.
डहाणू लोकल सुरू होण्याआधी वैतरणा ते डहाणूदरम्यानच्या प्रवाशांसाठी पुढील प्रकारच्या 20 गाडय़ा धावत असत. पॅसेंजर – 4, शटल – 8, मेमू -4, डीएमयू – 4
डहाणू लोकलने प्रवाशांना काय दिले त्याआधी समस्या काय होत्या ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
1) डहाणूसाठी एक तासापेक्षा जास्त अंतराने गाडय़ा धावत असत. 2) शाळा/कॉलेजात गेलेला आपला पाल्य शाळा/कॉलेज सुटल्यानंतर वेळेवर गाडी नसल्याने प्लेटफॉर्मवर बसून राहत असे आणि वेळप्रसंगी काही प्रसंगी टिंगलटवाळीस बळी पडत असे, वाईट मार्गासही लागत असे. 3) कामगारांना वेळेवर गाडय़ा नसल्याने आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नसे आणि कामावरून सुटल्यावर वेळेवर घरी पोहोचता येत नसे. 4) आपल्या वैतरणा ते डहाणूदरम्यानच्या कामगारांना कांदिवली ते थेट चर्चगेटपर्यंत कोणी कामावर ठेवत नसत. कारण तेथे कामावर पोहोचण्यासाठी गाडय़ाच नव्हत्या आणि कामगारांचा एक प्रवाह असा होता की, तो स्वतःहूनच गाडय़ांअभावी मुंबईसारख्या ठिकाणी कामावर जाणे टाळत असे. 5) एखाद्या रुग्णाला दवाखान्यात वेळेवर घेऊन जायचे झाल्यास गाडय़ांअभावी घेऊन जाऊ शकत नसत.
डहाणू लोकलमुळे वरील सर्व समस्यांची काही अंशी पूर्तता झाली हे खरे असले तरी अनेक प्रश्न कायमच आहेत. डहाणू लोकल सुरू झाली तेव्हा 9 लोकल फेऱ्या सुरू केल्या आणि एक लोकल फेरी त्यावेळची शटल बंद करून सुरू केली. म्हणजे 10 लोकलच्या फेऱ्या सुरुवातीला सुरू झाल्या. आज एकूण 21 फेऱ्या होत आहेत. त्यातील 6 लोकलच्या फेऱ्या शटल आणि मेमू बंद करून दि. 1 सप्टेंबर 2017 ला सुरू केल्या. म्हणजे सुरुवातीच्या 10 लोकल धरून 16 लोकल 21 मधून बाद केल्यास 13 वर्षांत फक्त 5 लोकल डहाणूच्या वाढल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडून अप आणि डाऊन दोन्ही मिळून डहाणू लोकलच्या 42 फेऱ्या होतात असा मोठा आकडा सांगितला जातो. तांत्रिकदृष्टय़ा खराही असेल, परंतु एकेरी फेऱ्या एकवीसच आहेत. कारण जाणाऱ्या प्रवाशांना दिवसभरात एकवीसच लोकल. तेच गणित येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू पडते.
या 13 वर्षांत डहाणू लोकलच्या फक्त 5 फेऱ्या रेल्वेने दिल्या आहेत याचा खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. येत्या 16 एप्रिल 2026 ला भारतीय रेल्वेला 173 वर्षे पूर्ण होत आहेत आणि डहाणू लोकलला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे महत्त्व ओळखून डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा विचार व्हावा.
n विरार-डहाणू चौपदरीकरण मार्गावरून विरार-वैतरणा तर सफाळे- केळवे रोडदरम्यान बुलेट ट्रेन मार्ग क्रॉस करत असून त्याचे पिलर (खांब) उभारणी करण्याचे जे काम सुरू केले आहे ते कधीपर्यंत पूर्ण होईल ते माहीत नाही आणि तोपर्यंत तरी विरार-डहाणू चौपदरीकरण रेल्वेलाइन टाकून मार्ग कसा पूर्ण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रेल्वेने जाहीर केलेली चौपदरीकरण प्रकल्पाची डेडलाइन जून-2027 कशी साध्य होईल हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरेल. तथापि मालगाडय़ांची वाहतूक मेन लाइनवरून डीएफसीसी मार्गावर 31 मार्च 2026 पासून वळविण्यात आली असल्याने नक्कीच बऱ्यापैकी स्पेस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच विरार स्थानकातील प्लेटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याने वाढत्या प्रवासी संख्या पाहता 15 डब्यांच्या लोकल सुरू करणे तसेच दोन लोकलमधील अंतर पाहता आणि कामगार,विद्यार्थी, भाजी/दूध विव्रेते यांनाही वेळेवर पोहोचता यावे यासाठी डहाणू लोकलच्या फेऱ्यासुद्धा वाढविणे आवश्यक आहे.






























































