
आयपीएलच्या रणांगणात आता घरच्या चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धडाकेबाज हल्ल्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या बंगळुरूच्या रडारवर आता लखनौ सुपर जायंट्सचा संघ असून बुधवारी रंगणारी ही लढत धडाकेबाज फलंदाजी विरुद्ध धारदार गोलंदाजी अशी असेल.
या हंगामात बंगळुरूने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, टीम डेव्हिड आणि देवदत्त पडिक्कल यांनी चौकार-षटकारांचा अक्षरशः स्फोट घडवला आहे. अवघ्या काही सामन्यांत 52 षटकार ठोकत या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवली आहे. 160 पेक्षा जास्त धावगती आणि प्रत्येक सामन्यात 200 पार धावा, यातून बंगळुरूचा आक्रमक अंदाज स्पष्ट दिसतो. सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेला हा संघ आता अव्वल स्थानावर झेप घेण्याच्या तयारीत आहे.
घरच्या मैदानाचा फायदा हेच बंगळुरूचे मोठे अस्त्र आहे. चिन्नास्वामीची सपाट खेळपट्टी आणि लहान सीमारेषा फलंदाजांसाठी स्वर्गच! आगामी तीन घरच्या सामन्यांत लखनौसह दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सविरुद्धची लढत असल्याने बंगळुरू हा फायदा पुरेपूर उचलण्याच्या निर्धारात आहे.
मात्र लखनौला कमी लेखणे धोकादायक ठरेल. गुणतालिकेत सातव्या स्थानावर असला तरी त्यांची गोलंदाजी भक्कम आहे. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी यांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकले आहे. शमीची 6.2 इकॉनॉमी बंगळुरूसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
तथापि, लखनौची फलंदाजी चिंतेचा विषय ठरली आहे. कर्णधार ऋषभ पंत अजूनही लय सापडलेला नाही, तर मिचेल मार्श, एडन मारक्रम आणि निकोलस पुरन यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी झालेली नाही. दुसरीकडे, बंगळुरूच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याने लखनौच्या फलंदाजांना संधी नक्कीच आहे. जेकब डफी आणि भुवनेश्वर कुमार यांची वेगवान जोडी, तसेच कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांची फिरकी किती प्रभावी ठरते, यावर सामन्याचे पारडे झुकणार आहे.
एकंदरीत, हा सामना म्हणजे स्फोटक फलंदाजी आणि चाणाक्ष गोलंदाजी यांच्यातील थरारक संघर्ष. बंगळुरूचा धडाका सुरू राहणार की लखनौची गोलंदाजी त्यावर ब्रेक लावणार याकडे संपूर्ण हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे.



























































