
भाजपच्या सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बुधवारी सकाळी अकरा वाजता राजभवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार आणि जनता दल (यु)चे अध्यक्ष नितीश कुमार, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, चिराग पासवान आणि जीतन राम मांझी उपस्थित होते.
बिहारच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. सम्राट चौधरी यांच्यासह जेडीयूच्या कोट्यातून विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज केवळ तीन नेत्यांचा शपथविधी झाला असून सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल.
PHOTO | Patna: BJP MLA Samrat Choudhary (@samrat4bjp) takes oath as Bihar CM. pic.twitter.com/ISe2zRVnN6
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2026
कोण आहेत सम्राट चौधरी?
सम्राट चौधरी 1190 पासून राजकारणात सक्रिय असून त्यांची राजकीय कारकिर्दी राष्ट्रीय जनता दलपासून सुरू झाली होती. 1995 मध्ये त्यांना एका राजकीय प्रकरणात तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1999 मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते. 2000 आणि 2010 मध्ये ते परबत्ता विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. 2014 मध्ये त्यांनी जनता दल (यु) मध्ये प्रवेश केला. जीतन राम मांझी सरकारमध्ये ते शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री राहिले. 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2023 मध्ये त्यांची बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2025 मध्ये त्यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री, तर सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडेच गृहखात्याचीही जबाबदारी देण्यात आली होती.




























































