
मुंबईतल्या सेस/पागडी इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची योग्यप्रकारे नोंद करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी X वर या पत्राची प्रत पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
”महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२०-२०२१ मध्ये मुंबईतील उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सेक्शन ७९ (अ) व ७९ (ब) बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली होती. सदर कायद्याला राष्ट्रपती महोदयांचीही मंजुरी प्राप्त झाली होती. तथापि, काही जागामालकांनी याविरोधात कायदेशीर अडचणी निर्माण केल्या आहेत. सुमारे १३,५०० हून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये लाखो भाडेकरू वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. तसेच हा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात येत आहे. तरी या कारवाईवर स्थगिती द्यावी व ज्या इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत, त्यांतील भाडेकरूंची योग्यप्रकारे नोंद करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे. आपल्या निदर्शनास हा विषय मी यापूर्वीही आणून दिला होता. त्याचप्रमाणे आज पुन्हा एकदा विनंती करत आहे की, या विषयाकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊन भाडेकरूंना न्याय मिळेल असा मार्ग काढावा जेणेकरून पुनर्विकास प्रक्रियेस चालना मिळेल”, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.




























































