हार्बरवर एसी लोकलच्या 14 पैकी 10 फेऱ्या रद्द, मध्य रेल्वेवर नामुष्की; प्रवाशांचा निघाला घामटा, वातानुकूलित रेकमध्ये बिघाड झाल्याने ‘गारेगार’ सेवा कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्बर रेल्वे मार्गावरील एसी लोकलसेवा बुधवारी पूर्णपणे कोलमडली. या मार्गावर एकाच गाडीच्या सहाय्याने दिवसभरातील सर्व एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्या एकमेव वातानुकूलित गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि 14 पैकी 10 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढवली. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसल्याने ‘गारेगार’ प्रवासाचे पैसे मोजूनही प्रवाशांना धक्काबुक्की सोसत प्रवास करावा लागला.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनपाठोपाठ हार्बर मार्गावर प्रजासत्ताक दिनापासून एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा केवळ एकाच गाडीच्या मदतीने चालवली जात आहे. संभाव्य तांत्रिक बिघाडाचा विचार करून पर्यायी एसी रेक हार्बरच्या सेवेत वेळीच दाखल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत हार्बर मार्गावर दररोज एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवल्या जातात. बुधवारी या फेऱ्यांपैकी तब्बल 10 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि त्या फेऱ्यांच्या वेळेत नॉन-एसी लोकलच्या फेऱ्या चालवण्यात आल्या. अचानक मोठय़ा प्रमाणावर फेऱ्या रद्द केल्याने एसी लोकलच्या नियमित प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ‘पीक अवर्स’ला धक्काबुक्की सहन करीत लोकल प्रवास करण्याची वेळ एसी लोकलच्या प्रवाशांवर आली. एसी रेकमधील तांत्रिक बिघाड सायंकाळच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर अवघ्या चार एसी फेऱ्या सेवेत धावल्या. संपूर्ण दिवसभर एसी लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने नियमित प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

लाखो प्रवाशांसाठी केवळ एक एसी लोकल

मेन लाईनप्रमाणेच हार्बरवर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांची संख्या दहा लाखांच्या घरात आहे. या लाखो प्रवाशांसाठी केवळ एका एसी लोकलच्या मदतीने दिवसभरात 14 फेऱ्या चालवल्या जात आहेत. हे रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारचे अपयश असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या पोस्टवर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रियांचा भडिमार केला.