
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
शरीर सरळ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा अस्थिधातू शरीराचा संपूर्ण डोलारा सांभाळतो.
वात दोषाचा प्रभाव असलेला धातू म्हणजे अस्थिधातू. म्हणूनच वृद्धावस्थेत वात वाढल्यामुळे हाडांची झीज होते. वात वाढला की, अस्थिधातू कमी होतो. वात कमी झाला की, अस्थिधातू वाढतो.
अस्थिधातूचे पोषण मेद धातूपासून होते. म्हणून अतिरेकी मेद कमी केल्यास हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. असे निरीक्षण आहे की, अज्ञानाने डाएट करणाऱया व्यायामपटूंमध्ये वारंवार हे आढळून येत आहे. त्यात हाडांबरोबर स्नायू कमकुवत होऊन वारंवार इजा होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गुडघे, टाचांचे लिगामेंट फाटणे हे अधिक दिसून येत आहे. अस्थी हा शरीरातील सर्वात कठीण आणि मजबूत धातू मुख्यत पृथ्वी महाभूतापासून बनलेला आहे.
त्याचे चरकसंहितेत वर्णन केल्यानुसार मजबूत, खरखरीत (खर), कोरडा, कठीण हे गुणधर्म असतात.
अस्थिधातूचे कार्य शरीर सरळ ठेवणे म्हणजे धारण असे आहे. अस्थिधातू शरीराला आकार देतो आणि हृदय, फुप्फुसे, मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतो. स्नायू, रक्तवाहिन्या, मज्जातंतू हे सर्व याच्या आसपास असतात. वायू व आकाश महाभूतामुळे हाडांमध्ये पोकळी निर्माण होते.
अस्थिधातू तयार होताना उपधातू म्हणून नखे आणि दात तयार होतात. त्याचप्रमाणे मल म्हणून केस आणि त्वचेवरील रोम तयार होतात. केस गळणे यावर बाहेरून तेल मलमे लावण्यापेक्षा अस्थिधातूचे पोषण केल्यास चांगला फायदा दिसून येतो.
आपल्या शरीरात चरक संहितेनुसार 360 हाडे आणि सुश्रुत संहितेनुसार 300 हाडे असतात. आधुनिक विज्ञाननुसार जन्मावेळी 270 आणि प्रौढ व्यक्तींमध्ये 206 हाडे असतात. अस्थिधातू उत्तम असलेली व्यक्ती अस्थिसार असते. अशा व्यक्ती दीर्घायुषी असतात. तसेच उत्तम सहनशक्ती, ठळक सांधे व हाडे, मजबूत दात, उत्साही, कामात अधिक उत्साही असतात.
शरीराला आकार व आधार देण्याबरोबरच मज्जाधातूला पोषण देणे हे अस्थिधातूचे महत्त्वाचे काम आहे.
शरीराचे संरक्षण करण्याबरोबर हालचाल करणे, श्रवण (कानातले हाड), आधुनिक शास्त्रानुसार रक्तनिर्मिती, कॅल्शियम साठवण आणि हार्मोन स्राव ही महत्त्वाची कामे अस्थिधातू करतो.
आहारात वात वाढवणारे पदार्थ, कोरडे, थंड, हलके, खार पदार्थ अस्थिधातू विकृती करतात. त्याचबरोबर जीवनशैली ही अस्थिधातूच्या विकृतीची कारण ठरू शकते. उदा- अतिव्यायाम, धावणे, अतिचालणे, घोडेस्वारी, आजच्या काळात मोटरसायकलने मैलोनमैल प्रवास यामुळे जास्त धक्के बसून अस्थी विकृती होऊ शकते. एका स्थितीत बराच वेळ बसल्याने अतिश्रमाने हाडांवर जास्त ताण येऊन अस्थिधातू विकृत होऊ शकतो.
अस्थिधातू कमी झाल्यास महत्त्वाचे लक्षण प्रथम दिसून येते ते म्हणजे केस गळणे.
त्याचबरोबर नखे व दात कमकुवत होणे, सांधे सैल होणे, हाडदुखी, थकवा वाटणे, शरीराचा कोरडेपणा वाढणे ही लक्षणे दिसून येतात.
अस्थी विकार झाल्यास अस्थिगत ज्वर तसेच वात विकार उदा- सांधेदुखी, निद्रानाश, अशक्तपणा ही लक्षणे दिसून येतात.
अस्थिधातू पोषणासाठी योग्य आहार वयानुसार बदलतो. आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार अस्थिधातू पोषणासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘अ’, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ महत्त्वाचे असतात. खाली वयानुसार आहार देण्याचा प्रयत्न केला आहे.
लहान मुलांसाठी दूध, साजूक तूप, लोणी, रागी (नाचणी), बाजरी, बदाम, खजूर, कॅल्शियमसाठी तीळ खूप चांगले आहेत. हाडांची वाढ जलद होत असल्याने दूध आणि नाचणी खूप फायदेशीर आहे.
तरुण वर्गासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ. प्रथिनासाठी अंडी, मूग, हरभरा, तीळ, अक्रोड. व्हिटॅमिन ‘अ’साठी सूर्यप्रकाश, संत्री, केळी इ. या वयात हाडांची घनता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रौढ वर्गासाठी अस्थिधातू पोषक आहार ः दूध, तीळ, रागी, डाळी, कडधान्ये, मर्यादित प्रमाणात तूप, हिरव्या भाज्या हाडांची झीज कमी करण्यावर भर द्या.
वृद्ध व्यक्तींनी हलका, पचायला सोपा आहार घ्यावा. तीळ लाडू किंवा चटणी, हाडांचे किंवा डाळीचे सूप, बदाम. या वयात हाडे ठिसूळ होणे टाळण्यासाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन अ अत्यंत गरजेचे.
जीवनशैलीत रोज थोडा सूर्यप्रकाश घ्या, नियमित व्यायाम (योग, चालणे), जास्त चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, धूम्रपान/मद्यपान टाळा.
आयुर्वेदिक उपचार पंचकर्म (विशेषत बस्ती), तिक्त क्षीर बस्ती, स्निग्ध व पौष्टिक आहार असे उपचार केले जातात.


























































